अहमदनगर दि.४ नोव्हेंबर
आजकालची तरुणाई ही मायावी जगात जगत असून मोबाईल हातात आल्यामुळे आजकालच्या तरुणांचे जीवन हे मोबाईलवरच मोठ्या प्रमाणात व्यस्त होत आहे. मोबाईलवर अनेक सोशल प्लॅटफॉर्म मिळाल्याने प्रत्येक क्षणाची अपडेट कोण आधी टाकतेय असाच काहीसा प्रकार तरुणांमध्ये सध्या दिसून येत आहे.
फेसबुक व्हाट्सअप, इंस्टाग्राम, रील या मोहमायी दुनियासह कॅफे आणि हुक्का पार्लर, रेव पार्टी यामध्येही तरुण तरुणी गुरफाटत जात असून या हुक्का पार्टी आणि कॅफेमध्ये नेमकं चालतंय काय हे अनेक वेळा समोर आले आहे मात्र तरीही अजूनही असे कॅफे बंद होत नाहीत.
सुरुवातीला नेट कॅफे ही संकल्पना सुरू झाली होती छोटे छोटे कप्पे टाकून प्रत्येकाला स्वतंत्र मिळेल अशी व्यवस्था केली जात होती मात्र याचा दुरुपयोग वाढल्याने आणि आता नेट आणि मोबाईलवर सर्व गोष्टी मिळत असल्याने नेट कॅफे बंद झाले आहेत. त्याची जागा आता कॅफे या गोड नावाने घेतली असून विविध ठिकाणी अद्यावत छोटे छोटे हॉटेल्स वजा कॅफे उघडली जात आहेत. या ठिकाणी तासावर बसण्याचे पैसे घेतले जातात तरुणतरुणींना अत्यंत कमी जागेत जास्त वेळ बसण्याची मुभा आणि कोणाचाही अडथळा येऊ नये म्हणून तयार केलेले छोटे छोटे रूम आणि महागड्या खाद्यपदार्थ यामुळे हे कॅफे जोरात सुरू आहेत. एकांत मिळवण्यासाठी या कॅफेचा उपयोग सध्या होत आहे. या कॅफेमध्ये अत्यंत भयानक प्रकार होत असून यामध्ये अल्पवयीन तरुण आणि तरुणी गुरफटत चालले आहेत .क्षणिक सुख आणि मोह माया यामुळे आजची पिढी ही चुकीच्या मार्गाला लागली असून वेळेत सावध होणे गरजेचे आहे.
तर हुक्का पार्लर आता अनेक मोठमोठ्या हॉटेलमध्ये पण चोरी छुपे सुरू आहेत. मावा, गुटखा हे तर सर्रास विविध ठिकाणी मिळत असून याची एक मोठी साखळी आहे यावर कितीही कारवाई केली तरी प्रतिबंध करणे हे प्रशासनाची डोकेदुखी असून तेही याकडे दुर्लक्ष करताना दिसून येतात.
अहमदनगर जिल्ह्याच्या आजूबाजूला म्हणजेच नाशिक, पुणे आणि छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ड्रग्स सारखे प्रकार मिळून आले आहेत हे ड्रग्स नगर मध्ये एव्हाना पोहचली असतील मात्र आपली पिढी या ड्रग्सच्या आहारी आणि कॅफेच्या आहारी जाण्याआधीच पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आपली मुलं नेमक कुठे जातात यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
मुलांना त्यांच्या भविष्याची काळजी नसते अथवा येणाऱ्या संकटांचे गांभीर्य नसल्यामुळे तरुण पिढी वाहवत चालली आहे. मात्र पालकांनी वेळेत आपल्या मुलांकडे लक्ष देऊन सर्वच गोष्टी गांभीर्याने सांगण्याची गरज आहे तरच आपली पुढची पिढी वाचू शकते .
कॅफेमध्ये नेमकं चालतंय काय हे उघडून सांगणे चुकीचे आहे मात्र त वरून तपिले ओळखणे ही पण काळाची गरज आहे त्यामुळे पालकांनी आपल्या मुला मुलींकडे आणि त्यांच्या जीवनशैलीकडे पाहणे गरजेचे आहे. अनेक अत्यंत भयानक प्रकार या कॅफेच्या माध्यमातून आणि हुक्का पार्लरच्या नावाखाली सुरू आहेत.पुढची पिढी बिघडत चालली आहे. त्यामुळे वेळीच लक्ष घालण्याची गरज आहे अन्यथा वेळ हातातून गेल्यानंतर पश्चाताप करण्याशिवाय हातात काहीच उरणार नाही त्यामुळे पालकांनो आपल्या मुलां मुलींककडे लक्ष द्या..