मुंबई : दिनांक 31 जानेवारी
आरोपींचीही मानसिकता समजून घेतली पाहिजे, त्यांना बैठकीत मारहाण करण्यात आली होती. आमच्या सांप्रदायाचा अवमान होतोय. जातीवाद वाढवला जात आहे, धनंजय मुंडे खंडणीवर जगणारे नाहीत, आम्ही त्यांच्या पाठीशी ठाम आहोत, अशी वक्तव्य करत भगवान गडावरील महंत नामदेव महाराज शास्त्री यांनी खळबळ उडवून दिली आहे. यावर आता संपप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना हालहाल करून मारले पाहिजे असा संताप व्यक्त केला आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबत आता माजी मंत्री छगन भुजबळ यांनी संतप्त भावना व्यक्त करताना म्हटले की, संतोष देशमुख यांना ज्या पद्धतीने मारले गेले ते अतिशय अमानुष आहे. राक्षस देखील अशी कृती करणार नाही. असाच प्रकार सोमनाथ सुर्यवंशीच्या बाबतीत घडला.ते पुढे म्हणाले, या विरोधात सर्वच घटकांनी लढायला पाहिजे. मात्र, तो या समाजाचा आहे, आणि हा दुसर्या समाजाचा आहे, हे मला काही पटत नाही. आरोपींना फासवर नाही, तर हाल हाल करून मारले पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया छगन भुजबळांनी व्यक्त केली.
राज्यात मस्सजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून वातावरण तापले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी निकटचे संबंध आणि आर्थिक संबंध समोर आल्याने मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कराड-मुंडे यांचे आर्थिक हितसंबंध समोर आणल्यानंतर राजीनाम्यासाठी दबाव वाढल्याने मुंडे यांनी सर्वप्रथम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यानंतर मुंडे थेट दिल्लीला रवाना झाले होते.