अहमदनगर दि.७ डिसेंबर :
नगर शहरातल्या रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत काँग्रेसने आसूड मोर्चा, स्वाक्षरी मोहिमा, आंदोलनं, उपोषण, खड्डे फोटो संकलन मोहीम राबवत थेट मुंबईच्या आझाद मैदानात खड्ड्यांच्या दुरावस्थेचे प्रदर्शन भरवत एल्गार करुन उपोषण केलं. मुख्यमंत्री कार्यालयाने याची दखल घेतली. काँग्रेसच्या दणक्यामुळेच खासदारांना याच प्रश्नावर मुंबई गाठावी लागली असल्याचा दावा काँग्रेसच्यावतीने जिल्हाध्यक्ष किरण काळेंनी केला आहे.
शहर काँग्रेसची आढावा बैठक पार पडली. त्यावेळी बोलताना काळेंनी हा दावा केला आहे. खासदारांनी शहरातील रस्त्यांसाठी रु. २५ कोटींची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे केली आहे. यासाठी त्यांनी नुकतीच मुंबईत भेट घेतली. त्यावर बोलताना काळे म्हणाले, रस्त्यांची दुरावस्था पाहता २५ ऐवजी रु. ५० कोटींची मागणी त्यांनी करायला हवी होती. मात्र केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या रु. ३०० कोटींच्या फसव्या घोषणेप्रमाणे गाजर दाखवून नगरकरांची चेष्टा करू नये.
“देर आये, दुरुस्त आये” असेच म्हणावे लागेल. मात्र काँग्रेस कार्यकर्त्यांनी नगरकरांच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने प्रशासन, शासन दरबारी केलेला पाठपुरावा, जनतेत जात घेतलेली जनआंदोलनाची भूमिका यामुळेच लोकप्रतिनिधींवर नगरकरांचा दबाव निर्माण करण्यामध्ये काँग्रेस यशस्वी झाली. त्यामुळेच आम्हीच शहरातील खरेखुरे सक्षम विरोधी पक्ष असल्याचा पुनरुच्चार काळे यांनी केला आहे.
काळेंची भविष्यवाणी
केंद्रातील हुकुमशाही सरकारमध्ये स्वपक्षाच्या खासदारांना अजिबात महत्व देत नाहीत. बोलूही देत नाहीत. विद्यमान खासदार हे बोलण्यात पटाईत आहेत. त्यांची दिल्लीत घुसमट होत आहे. त्यांनी आपल्या विशेष यंत्रणे मार्फत नगर शहरातून स्वतःची उमेदवारी करण्यासंदर्भात चाचपणी केली आहे. मागील विधानसभा निवडणुकीत स्व.अनिलभैय्या राठोड यांच्यासह शिवाजी कर्डिले यांना पाडण्यात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. दक्षिण लोकसभा मतदारसंघात सर्वत्रच मोठी नाराजी आहे. त्यामुळे ते आता भाजपाकडून शहरातून विधानसभा निवडणूक लढवतील, अशी भविष्यवाणी किरण काळेंनी केली आहे. त्यामुळे आता आमदारकीसाठी इच्छुक असणाऱ्या स्थानिक भाजप नेत्यांनी आपल्या स्वप्नांना मुरड घालत त्यांच्या प्रचारासाठी सज्ज राहावे. शहरातून उमेदवारी करण्याचे वेध लागल्यामुळेच त्यांनी आपल्या राष्ट्रवादीच्या आमदार मित्राला नगरमध्येच सोडून जात एकट्यानेच मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचा टोला देखील काळेंनी लगावला आहे.
आ. निलेश लंकेच्या उपोषणाला शहर काँग्रेसचा पाठिंबा :
दरम्यान, पारनेरचे राष्ट्रवादीचे आ.निलेश लंके यांनी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील विविध तालुक्यांमधून जाणाऱ्या प्रमुख महामार्गांच्या दुरावस्थेच्या प्रश्नावरून सुरू केलेल्या उपोषणाला काळे यांनी कार्यकर्त्यांसह भेट देत काँग्रेसच्या वतीने पाठिंबा दिला आहे. लंके यांच्यावर ज्येष्ठ नेते शरद पवारांची विशेष मर्जी आहे. त्यांच्यासारखा तगडा, लोकप्रिय उमेदवार लोकसभेला महाविकास आघाडीने दिल्यास ते मोठ्या मताधिक्याने खासदार होतील. त्यांना उमेदवारी दिल्यास काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आ.बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली नगर शहरातून लंकेंना काँग्रेसच्या माध्यमातून विक्रमी मताधिक्य मिळवून देऊ, असा विश्वास काळे यांनी व्यक्त केला आहे.
यावेळी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, अल्पसंख्यांक काँग्रेसचे नेते अनिस चुडीवाला, युवक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते पाटील, शहर जिल्हा महासचिव इम्रान बागवान, शहर उपाध्यक्ष अशोक शिंदे, सावेडी उपनगर विभाग प्रमुख अभिनय गायकवाड, युवक काँग्रेस उपाध्यक्ष गौरव घोरपडे, इंजिनिअर सुजित क्षेत्रे, विद्यार्थी काँग्रेस जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष किशोर कांबळे, आकाश जाधव, काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष उषाताई भगत, सरचिटणीस मिनाज मोमिन, सचिव आशाताई लांडे, काँग्रेस रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या जिल्हाध्यक्ष राणीताई पंडित, काँग्रेस अपंग विभाग शहर समन्वयक सोफियान रंगरेज, प्रशांत जाधव आदींसह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.