अहिल्यानगर : वृद्ध व्यक्तीच्या मालमत्तेचे कथित बेकायदेशीर हस्तांतरण, बनावट दस्तऐवज तयार करणे आणि फसवणूक केल्याच्या आरोपांशी संबंधित फौजदारी प्रकरणात आरोपी ॲड. तेजस्वी तवले यांना नियमित जामीन मंजूर करण्यात आला आहे. अहिल्यानगर येथील न्यायालयाने दि. २३ ऑक्टोबर २०२६ रोजी हा निर्णय दिला आहे. या प्रकरणात ॲड. तवले यांच्यावतीने ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. उमेशचंद्र यादव पाटील व ॲड. महेश तवले यांनी युक्तिवाद केला.

या प्रकरणात एका ७५ वर्षीय वृद्ध व्यक्तीच्या मालमत्तेचे कथित बेकायदेशीर हस्तांतरण करण्यासाठी बनावट दस्तऐवज तयार करणे, फसवणूक करणे तसेच वृद्ध व्यक्तीला त्याच्या इच्छेविरुद्ध संस्थेत ठेवण्याचे आरोप करण्यात आले आहेत. याशिवाय, वृद्धाच्या बँक खात्यातून डेबिट कार्डच्या माध्यमातून रक्कम काढल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला होता. या प्रकरणाची नोंद अहिल्यानगर येथील कोतवाली पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. संबंधित आरोपांच्या अनुषंगाने तपास सुरू असून, आरोपीच्या जामीन अर्जावर जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. बी. गायधनी यांच्यासमोर सुनावणी झाली.


