Home क्राईम खबर अहिल्यानगरची धीरज परदेशी हत्याकांड प्रकरणी पाच आरोपींचे जामीन अर्ज फेटाळले जिल्हा...

खबर अहिल्यानगरची धीरज परदेशी हत्याकांड प्रकरणी पाच आरोपींचे जामीन अर्ज फेटाळले जिल्हा व सत्र न्यायालयाचा निर्णय; पूर्वनियोजित कट व तपासाच्या प्राथमिक अवस्थेचा ठपका

3
Oplus_0

📰
अहिल्यानगर प्रतिनिधी :
शहरातील गाजलेल्या धीरज परदेशी हत्याकांड प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपींना मोठा धक्का दिला आहे. मा. जिल्हा व सत्र न्यायालय, कोर्ट क्र. १ चे न्यायाधीश मा. श्री. आर. एस. गुप्ता यांनी या प्रकरणातील पाच आरोपींचे नियमित जामीन अर्ज फेटाळले आहेत.

प्रकरणातील फिर्यादीनुसार, दिनांक ७ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी सुमारे ४.१० वाजता मुकुंदनगर येथील दर्गा दायरा कब्रस्तान परिसरात फिर्यादी अक्षय मुळे, धीरज परदेशी आणि साक्षीदार काव्य गणेश तावरे हे स्ट्रीट लाईट पॅनलचे काम करत होते. त्यावेळी आरोपींनी एकत्र येत लाकडी बल्ले व लोखंडी पाइपच्या साहाय्याने धीरज परदेशी यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप आहे.

गंभीर जखमी झालेल्या धीरज परदेशी यांना उपचारासाठी मॅककेअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच ९ ऑगस्ट २०२६ रोजी त्यांचा मृत्यू झाला.

तपासादरम्यान या गुन्ह्यात आणखी नऊ आरोपींचा सहभाग निष्पन्न झाल्याचे पोलिस तपासात समोर आले. आरोपी युनुस खानसाहेब शेख, वसीम रहिम सैयद, इम्रान मुसा सैयद, अरमान लियाकत सैयद आणि मोहम्मदरशाद इम्रान सैयद यांनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.

सुनावणीदरम्यान सरकार पक्ष आणि आरोपींच्या वतीने सविस्तर युक्तिवाद करण्यात आला. न्यायालयाने आपल्या निरीक्षणात नमूद केले की, सदर गुन्हा घडवून आणण्यासाठी आरोपींनी पूर्वनियोजित कट रचल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. तसेच तपास अद्याप प्राथमिक टप्प्यात असून आरोपींची ओळख परेड घेणे बाकी असल्याने जामीन मंजूर करणे उचित ठरणार नाही.
सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने सर्व आरोपींचे नियमित जामीन अर्ज फेटाळले.

या प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने सहायक सरकारी वकील श्रीमती पुष्पा कापसे-गायके यांनी काम पाहिले. त्यांना मूळ फिर्यादीचे वकील अॅड. सुहास टोणे, अॅड. सागर टाक आणि अॅड. अमित गाडेकर यांनी सहकार्य केले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here