अहिल्यानगर – अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन हे डॅशिंग अधिकारी असले तरी मात्र त्यांच्या हाताखाली काही चुकीचे लोक काम करत असल्यामुळे पोलीस दलाची प्रतिमा खराब होत चालली आहे. दोन दिवसांपूर्वी पातळी पोलीस स्टेशनमध्ये लाखो रुपयांची लाच घेताना एक कर्मचारी चतुर्भूत झाला त्याआधी संगमनेर येथील पीएसआय श्रीकांत सावंत यांनी संगमनेर बस स्थानकावर ड्रग्ज ची कारवाई केली होती. मात्र ती कारवाई सीसीटीव्हीमुळे उघडकीस आली आहे.यात सापळा रचून एका तरुणाला फसवल्याचं समोर आले आहे याप्रकरणी आता पीएसआय सावंत यांना तडकाफडकी कंट्रोल रूमला जमा केली ची माहिती समोर आली आहे. ही बातमी कुठेतरी थांबत असतानाच आता नगर शहरातील कोतवाली पोलीस स्टेशन मधील असाच एक प्रकार समोर आला आहे.
कोतवाली पोलीस ठाण्यातील पीएसआय दीपक मेढे यांच्या पक्षपाती आणि मनमानी कार्यपद्धतीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे सरचिटणीस नीलेश बांगरे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली आहे. मेढे यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांची त्रयस्थ अधिकाऱ्यामार्फत चौकशी करून तातडीने निलंबन अथवा बदली करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, दिनांक २१ सप्टेंबर रोजी मार्केट यार्ड चौकातील नगर तालुका उपनिबंधक कार्यालयात अल्ताफ गुलाब सय्यद याने धुडगूस घालून कर्तव्यावर असलेले कर्मचारी देविदास पारधे यांच्यावर स्क्रू ड्रायव्हरने जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. इतर कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे पारधे बचावले. ही तक्रार कोतवाली पोलीस ठाण्यात गेल्यानंतर उपनिरीक्षक दीपक मेढे यांनी आरोपीची बाजू घेत फिर्यादी पारधे यांनाच सुमारे ६ तास चौकशीच्या नावाखाली वेठीस धरल्याचा आरोप बांगरे यांनी केला आहे.
शासकीय कामात अडथळा आणि प्राणघातक हल्ल्याचा गंभीर गुन्हा असतानाही आरोपी अल्ताफ सय्यद याला केवळ नोटीस देऊन सोडून देण्यात आले, तर उलट फिर्यादीवरच अदखलपात्र गुन्हा दाखल करून मोबाईल चोरीचा गुन्हा नोंदवण्याची धमकी दिली गेली, असे निवेदनात नमूद केले आहे.
गणेशोत्सव ढोल पथकातील तरुणांवर केली होती तात्काळ अटकेची कारवाई यापूर्वी गणेशोत्सवादरम्यान ढोल पथकातील तरुणांवर अशाच कलमांखाली तत्काळ अटकेची कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे मेढे यांच्या कार्यशैलीवर आणि निष्पक्षतेवर गंभीर संशय निर्माण झाल्याचे बांगरे यांनी म्हटले आहे.
या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, मेढे यांचे कॉल डिटेल्स तपासावेत आणि अहवाल येईपर्यंत त्यांना तत्काळ निलंबित अथवा अन्यत्र बदली करावी, अशी ठाम मागणी नीलेश बांगरे यांनी केली आहे.



