अहमदनगर दिनांक ९ ऑक्टोबर
ज्येष्ठ लेखक निर्भय बनो चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि मुख्याध्यापक हेरंब कुलकर्णी यांच्यावर शनिवारी दुपारी काही समाजकंटकांनी हल्ला करून त्यांना जखमी केले होते. याबाबत हेरंब कुलकर्णी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात तीन लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी हल्ला झाल्यानंतर या प्रकाराची वाच्यता हेरंब कुलकर्णी यांनी कुठेही केली नव्हती सोमवारी सकाळी काही सामाजिक कार्यकर्त्यांना या घटनेची माहिती कळल्यानंतर समाज माध्यमांवर हेरंब कुलकर्णी यांना मारहाण झाल्याची बातमी कळाली आणि तिथून पुढे सरकारसह सर्वच यंत्रणा कामाला लागली.
हेरंब कुलकर्णी यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना फोन करून याबाबत आरोपींना तत्काळ अटक करण्याचे आदेश दिले आहे.तर खासदार सुप्रियाताई सुळे यांनी हेरंब कुलकर्णी यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली त्यानंतर आमदार संग्राम जगताप यांनीही हेरंब कुलकर्णी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.
पोलिसांनी आता या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज हस्तगत केले असून या सीसीटीव्ही फुटेज मधील वर्णनानुसार आरोपींचा शोध सुरू केला आहे. हेरंब कुलकर्णी यांनी व्यक्त केलेल्या संशयावरून हेरंब कुलकर्णी मुख्याध्यापक असलेल्या सिताराम सारडा शाळेजवळील तंबाखू आणि गुटखा विक्री करणाऱ्या टपऱ्या काढण्यासाठी त्यांनी महापालिका आणि पोलीस प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या या रागातून त्यांच्यावर हल्ला झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला होता त्यानुसार आता पोलिसांनी तपासाची दिशा ठरवली असून लवकरात लवकर आरोपी जेरबंद होतील अशी माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.
सीसीटीव्ही मध्ये तीन तरुण हेरंब कुलकर्णी यांना मारहाण करून जाताना एका पांढरा रंग असलेल्या एक्टिवा कंपनी सारख्या गाडीवर दिसून येत आहेत या वर्णनावरून पोलिस आता आरोपींचा तपास घेत आहेत.