अहमदनगर दि. ६ सप्टेंबर
सावेडी हार्ट बीट हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी असलेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी बुधवारी पहाटे हॉस्पिटलमध्ये तोडफोड केली. या प्रकरणी डॉ. चंद्रकांत कदम यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आप्पासाहेब बबन वाकचौरे, काकासाहेब बबन वाकचौरे व इतर तिघे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेची हकीकत अशी की डॉ. कदम यांच्या हॉस्पिटलमध्ये बबन वाकचौरे यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता. त्याचा राग मनात धरून आप्पासाहेब व काकासाहेब वाकचौरे यांनी हॉस्पिटलमधील डॉ. कदम, डॉ. अनिकेत गुणे व कर्मचारी विशाल काळे यांना मारहाण केली. तसेच हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागातील मॉनिटर, व्हेंटीलेटर, खुर्ची, बेड रोलिंग यांची मोडतोड केली होती या घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक मधुकर साळवे व पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे यांनी घटनास्थळी भेट दिली होती.