अहिल्यानगर दिनांक 2 जानेवारी
अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या अर्ज छाननीच्या दिवशी केडगाव उपनगरात प्रचंड राजकीय नाट्य पाहायला मिळाले. प्रभाग क्रमांक १५ मधील भाजपचे उमेदवार सुजय मोहिते आणि दत्ता गाडळकर यांच्या उमेदवारी अर्जावर विरोधी उमेदवारांनी हरकती घेतल्याने दिवसभर तणावाचे वातावरण होते. अखेर तब्बल ७ ते ८ तासांच्या मॅरेथॉन सुनावणीनंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी रात्री ११वाजुन ४७ मिनिटांनी या हरकती फ `टाळून लावत दोन्ही अर्ज वैध ठरवले. छाननी प्रक्रियेदरम्यान प्रभाग १५ ‘ब’ आणि ‘ड’ मध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. भाजपचे अधिकृत उमेदवार सुजय मोहिते आणि दत्ता गाडळकर यांच्या विरोधकांनी आक्षेप घेतले होते. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर दोन्ही बाजूंच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. निकाल काय लागणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. निवडणूक कार्यालयाबाहेर दोन्ही गटांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी केडगावमध्ये कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. निकालाची प्रतीक्षा करत असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये दिवसभर उलटसुलट चर्चा सुरू होत्या. मात्र अखेर दोघांच्याही अर्जावरील हरकती निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळून लावत त्यांचे अर्ज वैध ठरविले. त्यामुळे या दोघांसह त्यांच्या समर्थकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

या सर्व घडामोडी नंतर प्रभाग क्रमांक 15 ब चे उमेदवार दत्ता गाडळकर यांनी सूचक प्रतिक्रिया दिली असून “विरोधकांवर राग नाही मात्र आता गुळाला उधळल्या शिवाय राहत नाही”.प्रभागातील जनता आपल्या बरोबर असून आपण पहिल्या परीक्षेत उत्तीर्ण झालो आहे आता जनतेच्या हातात आपले भविष्य आहे मात्र जनता म्हणजेच मतदार आपल्या सोबत असून सकाळ पासून जो काही विषय सुरू होता त्या बाबत प्रभागातील मतदारांना समजल्या नंतर त्यांनी आपल्या पाठिंब्यासाठी दिवसभर जो काही संपर्क करून फोन वरून प्रत्यक्ष भेटून आपल्या पाठीशी उभा असल्याचे प्रत्येकाने सांगितले त्यामुळे आता ही निवडणूक मतदारांनी हाती घेतली आहे असेही दत्ता गाडळकर यांनी सांगितलय