अहिल्यानगर – महापालिकेच्या स्थायी समिती आणि महिला व बालकल्याण समिती सदस्यांची निवड, तसेच स्वीकृत सदस्यांच्या निवडी गुरुवारी झालेल्या विशेष सभेत करण्यात आल्या. महापौर ज्योती गाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत सुरुवातीला स्थायी समितीचे १६ सदस्य व महिला बालकल्याण समितीचे १६ सदस्य निवडले गेले. त्यानंतर दुसऱ्या सभेत सहा पैकी पाच स्वीकृत सदस्यांच्या निवडी करण्यात आल्या. शिवसेनेकडून स्वीकृत सदस्य म्हणून सादर झालेला अर्ज अपत्य व मालमत्तेबाबतचे शपथपत्र न जोडल्याने रद्द करण्यात आल्याची माहिती आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली.
सभेस उपमहापौर धनंजय जाधव, अतिरिक्त आयुक्त नागेंद्र मुतकेकर, नगरसचिव मेहेर लहारे उपस्थित होते. सुरवातीला गटनेत्यांनी स्थायी समिती व महिला बालकल्याण समितीच्या सदस्यांची नावे बंद पाकिटात महापौरांकडे सादर दिली. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे गटनेते प्रकाश भागानगरे, भाजपच्या गटनेत्या शारदा ढवण, शिवसेनेचे गटनेते दत्ता कावरे, एमआयएमचे गट नेते सय्यद शहाबाज व काँग्रेसचे गटनेते शम्स खान यांनी त्यांच्या पक्षाच्या कोट्याप्रमाणे दोन्ही समित्यांवरील नगरसेवक सदस्यांची नावे दिली. महापौर ज्योती गाडे यांनी ही नावे जाहीर केली.

स्थायी समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या गौरी बोरकर, हरप्रीतकौर गंभीर, सुरेश बनसोडे, संध्या पवार, मीना चोपडा व पौर्णिमा गव्हाळे, भाजपकडून सुभाष लोंढे, बाबासाहेब वाकळे, निखिल वारे, मनोज दुलम, मनोज कोतकर व सोनाबाई शिंदे, शिवसेना पक्षाचे नवनाथ कातोरे व सुनिता गेनप्पा, एमआयएमकडून शेहनाज शेख, तर काँग्रेसतर्फे मिनाज खान यांची निवड झाली आहे. महिला व बालकल्याण समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिपाली बारस्कर, सुनिता भिंगारदिवे, अनिता शेटीया, काजल भोसले, सुनिता कांबळे, आश्विनी लोंढे, भाजपच्या वंदना ताठे, शीतल ढोणे, पुष्पा बोरूडे, आशा कातोरे, रोशनी त्र्यंबके व वर्षा सानप, शिवसेनेच्या मंगल लोखंडे, रुपाली दातरंगे, एमआयएमच्या शेहनाज शेख, तर काँग्रेसच्या मिनाज खान यांची निवड झाली.
दुसऱ्या विशेष सभेत गटनेत्यांकडून महापौरांकडे व आयुक्तांकडे नावे व अर्ज सादर करण्यात आले. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे विकास जगताप, बाबासाहेब नागरगोजे, रेवणनाथ पवार, भाजपाचे रवींद्र बारस्कर व विशाल नाकाडे यांचे अर्ज छाननीमध्ये वैध ठरले. महापौर ज्योती गाडे यांनी त्यांच्या निवडी जाहीर केल्या. शिवसेनेकडून आदेश जाधव यांचे नाव सुचवण्यात आले होते. मात्र, त्यांच्या अर्जासमवेत अपत्यांबाबत व मालमत्तेबाबत शपथपत्र जोडले नव्हते. त्यामुळे त्यांचा अर्ज रद्द करण्यात आला. शिवसेनेच्या कोट्यातील ही जागा रिक्त ठेवण्यात आली आहे. भविष्यात स्वीकृत सदस्य निवडीसाठी होणाऱ्या सभेत त्यांना अर्ज दाखल करता येईल, असे आयुक्त यशवंत डांगे यांनी स्पष्ट केले.
स्वीकृत सदस्य पदासाठी नागरगोजे बाबासाहेब संतोष (संत वामन भाऊ भगवान बाबा सामाजिक प्रतिष्ठान), जगताप विकास दादासाहेब (युवा शक्ती प्रतिष्ठान), पवार रेवन्नाथ दगडू (उपनगर बुद्धिबळ सेवा संस्था), विशाल नाकाडे (श्री महालक्ष्मी प्रतिष्ठान), रवींद्र बारस्कर (विचारधन चेस अकॅडमी अँड स्पोर्ट क्लब), जाधव आदेश सुरेश (नंदनवन सार्वजनिक वाचनालय) यांना सामाजिक संस्थेचा अनुभव असल्याने त्यांची नावे सुचवण्यात आली होती. यातील आदेश जाधव वगळता सर्वांची निवड करण्यात आली.