अहमदनगर दि.७ नोव्हेंबर
ओंकार भागानगरे खूनप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेला संशयित आरोपी गणेश हुच्चे याची भेट घेण्यासाठी आरोपीचा भाऊ म्हणून अमोल हुच्चे या नावाने बनावट आधारकार्ड करून त्या नावाने भेट घेत कारागृह प्रशासनाची दिशाभूल केल्याचा प्रकार समोर आला आहे. बनावट आधारचा वापर करणार्याचे नाव अमोल येवले असून त्याने कारागृह प्रशासनाची दिशाभूल केल्याची फिर्याद तुरुंग अधिकारी सुवर्णा शिंदे यांनी दिली आहे. त्यानुसार कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
गणेश हुच्चे हा आरोपी ओंकार भागानगरे याचा खून केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत जिल्हा कारागृहात बंदी आहे. त्याची येवले याने अमोल हुच्चे या नावाने बनावट आधारकार्ड तयार करून 6 ऑक्टोबर रोजी भेट घेतल्याची तक्रार पांडुरंग भागानगरे यांनी केली होती. आरोपी गणेश हुच्चे याची भेट घेणारा अमोल हुच्चे हा त्याचा भाऊ नसून त्याचे नाव अमोल येवले आहे. त्याच्या बनावट आधारकार्डचा आमच्याकडे पुरावा आहे, अशी तक्रार करत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी भागानगरे यांनी केली होती .
तुरुंग अधिकारी श्रीमती सुवर्णा शिंदे यांना या फसवेगिरीबद्दल पांडुरंग भागानगरे यांनी माहिती दिल्यानंतर सुवर्णा शिंदे यांनी उलट भागानगरे यांनाच तुम्ही अशा गोष्टींच्या फांद्यात का पडता असा सल्ला दिला तसेच आम्ही पाहू कुणाला भेटू द्यायचे ते आणि अमोल येवले हा माझ्या सांगणेवरूनच गणेश याला भेटायला येतो तुम्ही या भानगडीत पडू नका. असे म्हणून मलाच खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली . तसेच माझ्या समोरच श्रीमती सुवर्णा शिंदे यांनी फोन लावला आणि समोरील इसमास सांगितले की अमोल येवले हा गणेशला भेटतो हे समोरच्यांना कळाले आहे. त्यामुळे त्याला काही दिवस इकडे पाठवू नका त्याचा डबा दुसऱ्या मार्फत पाठवा मी तो त्याला पोहोच करण्याची व्यवस्था करते. त्यानंतर मला उगाच कशाला आमच्या पोटावर पाय देता शांत बसा नाहीतर निट करीन अशी धमकी दिली आशा आशयाची तक्रार ओमकार भागानगरे यांचे वडील पांडुरंग तुकाराम भागानगरे यांनी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या तक्रार अर्जात केली आहे.
त्यामुळे आता अमोल येवले याच्यावर गुन्हा दाखल झाला असला तरी ज्या अधिकाऱ्यांना सांगूनही अमोल येवले याला पाठीशी घालण्याचा प्रकार करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई कधी करणार असा प्रश्न आता उपस्थित राहिला आहे. कारण पांडुरंग भागानगरे यांनी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या तक्रार अर्जात सर्व हकीगत सविस्तरपणे दिली असून त्यामुळे या गंभीर चूक प्रकरणी तुरुंग अधिकाऱ्यांवर ही कारवाई होणे गरजेचे आहे.