अहमदनगर दि.२७ सप्टेंबर
विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे आता सर्वच पक्षातील इच्छुक उमेदवार विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले असून पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारी मागणी करता अनेक इच्छुक नेते भेटी गाठी घेत आहेत हेच चित्र सध्या पाहायला मिळतेय.
अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघात सध्या महाविकास आघाडी कडून अनेक इच्छुक उमेदवार असून मात्र ही जागा कोणत्या पक्षाला सुटते यावरच सर्व अवलंबून आहे. प्रामुख्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष प्रमुख दावेदार आहेत तर काँग्रेस पक्षाही नगर शहर मतदारसंघावर दावा ठोकून आहे.
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून अनेक चेहरे सध्या उमेदवारीसाठी इच्छुक असून यासाठी सर्वजण मुंबई येथे मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेत आहेत. मात्र आता नगर शहर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आणि ज्येष्ठ नेते शशिकांत गाडे सर यांचे नाव आघाडीवर असून जर महाविकास आघाडी कडून शशिकांत गाडे सर यांना उमेदवारी जाहीर झाली तर सर्वच महाविकास आघाडीतील नेते त्यांचे काम करतील असा विश्वास आघाडीतील नेत्यांनी व्यक्त केला आहे.
शशिकांत गाडे सर यांची प्रतिमा शांत संयमी नेता म्हणून असून अहमदनगर शहराच्या राजकारणात आजपर्यंत त्यांनी मोठमोठ्या विरोधकांना टक्कर देत राजकारण सुरू ठेवले आहे. नगर शहरासह नगर तालुक्यात यांनी बलाढ्य शक्तीला टक्कर देऊन शिवसेनेचे अस्तित्व निर्माण केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे धुरा असून त्यांनी ही धुरा यशस्वीपणे पार पाडली आहे. त्यामुळे शांत संयमी नेता आणि विरोधकांना टक्कर देणारा चेहरा म्हणून शशिकांत गाडे सर यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकते.