छत्रपती संभाजीनगर दि.२७ डिसेंबर
राज्यात सरकारने राज्यात २०१२ पासून गुटखा आणि सुगंधी सुपारीवर विक्री आणि उत्पादन यावर बंदी आणलेली आहे.मात्र तरीही या बंदी असलेली सुगंधी सुपार,गुटखा यांची सर्रास विक्री महाराष्ट्र मध्ये सर्व ठिकाणी होताना दिसते. ही बंदी कडक अमलात आणावी आणि राज्य सरकारने यासाठी प्रयत्न करावेत याकरिता तांभेरे येथील सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब पवार यांनी पानमसाला, गुटखा बंदी कडक करण्यासाठी खंडपीठात अॅड. सतीश तळेकर यांच्यामार्फत जनहित याचिका दाखल केली होती.
या याचिकेवर न्या. अभय वाघवसे यांच्यासमोर सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने गुटखा आणि पानमसाला व्यावसायिकांवर करण्यासाठी ठोस कारवाई राज्यातील सात विभागांत विशेष पथकाची निर्मिती करा, असे आदेश खंडपीठाने राज्य सरकारला दिले. पुढील सहा महिन्यांमध्ये कुशल मनुष्यबळासह अत्याधुनिक अन्न चाचणी प्रयोगशाळा स्थापन करा, तक्रार नोंदणीसाठी हेल्पलाइन नंबर सुरू करा, असे निर्देशही खंडपीठाने दिले आहेत.तसेच राज्य सरकारला राज्यातील सात विभागांमध्ये सात विभागासाठी अन्न सुरक्षा आणि मानक कायद्यानुसार
विशेष पथकांची निर्मिती करून तसे परिपत्रक प्रकाशित करण्याचे आदेश दिले आहेत. सोबतच एक सार्वजनिक टोल फ्री नंबर बनवून तो नंबर वेळोवेळी
प्रकाशित करावा, जेणेकरून नागरिक तक्रार नोंदवू शकतील, नवीन अन्न चाचणी प्रयोगशाळा बनवून त्या
प्रयोगशाळा पूर्णतः अन्न सुरक्षा आणि मानक विभागाच्या ताब्यात दिल्या जातील, याची काळजी घ्यावी, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
याचिकाकर्त्यांच्या वतीने अजिंक्य काळे आणि अॅड. प्रज्ञा तळेकर यांनी काम पाहिले. शासनाच्या अॅड. डी. आर. काळे यांनी बाजू मांडली.