Home शहर नगरकरांनो, सावधान! अनोळखी फ्रेंड रिक्वेस्ट, हनी ट्रॅप वाढलेत; नगर शहरात व्यापाऱ्यांच्या मुलांना...

नगरकरांनो, सावधान! अनोळखी फ्रेंड रिक्वेस्ट, हनी ट्रॅप वाढलेत; नगर शहरात व्यापाऱ्यांच्या मुलांना फसवण्याचा घडल्यात दहा ते बारा घटना… अशा घटना तुमच्यासोबत पण होऊ शकतात..

अहमदनगर दिनांक २९ डिसेंबर

फेसबुक व्हाट्सअप अशा समाजमाध्यमांद्वारे मैत्री करून अश्लील फोटो आणि व्हिडिओ पसरवण्याची भीती दाखवून खंडणीसाठी धमकावण्याच्या प्रकारात आता दुपटीने वाढ झाली आहे. देशात असे प्रकार रोजच घडत आहेत सायबर क्राईम विभाग याबाबत अनेक वेळा नागरिकांना सतर्क करण्याचा प्रयत्न करत असतो मात्र तरीही अशा मोहोजाळात उच्चशिक्षितच अडकतात ही मोठी गंभीर बाब आहे.संरक्षण विभागातील पुण्यातील ज्येष्ठ शास्त्रज्ञ ऑनलाइन मैत्रीच्या जाळ्यात (हनी ट्रॅप) अडकल्याने हा प्रकार फक्त भारतात नाहीतर आंतरराष्ट्रीय स्तरावरही सुरू असल्याचं लक्षात आले आहे.

अहमदनगर शहरातही असेच काही चे प्रकार सुरू असून फेसबुक वरून मैत्री करून आणि त्यानंतर व्हाट्सअप आणि मोबाईल कॉल वरून झालेल्या संभाषणातून ब्लॅकमेलिंग करून खंडणी मागण्याचे प्रकारही नगर शहरात घडत आहेत. विश्वासनीय सूत्रांच्या द्वारे मिळालेल्या माहितीनुसार नगर शहरातील मोठमोठ्या दहा ते बारा व्यवसायिकांच्या मुलांना आशा ब्लॅकमेलिंगच्या प्रकाराला सामोरे जावे लागले आहे. मात्र इज्जतीच्या आणि कुटुंबीयांच्या भीतीने पोलिसांमध्ये जाण्यासाठी हे तरुण घाबरतात आणि जर एखादा तरुण पोलीस स्टेशन पर्यंत गेला तर त्याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हाही दाखल करण्यास समोरची व्यक्ती मागेपुढे पाहत नसल्याने तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करावा लागण्याची परिस्थिती अशा तरुणांवर आलेली आहे.

एका तरुणाने आत्तापर्यंत तीन ते चार कोटी रुपये दिले असून त्याचा घर संसारही उध्वस्त झालेला आहे. मात्र अद्यापही त्याच्या मागील सासेमिरा सुटला नसल्याची माहिती समोर आली असून या प्रकरणात खंडणीखोरांबरोबरच चांगले चांगले दलाल पैसे कमवण्यासाठी काम करत असतात आणि हानी ट्रॅप मध्ये फक्त मुलगी फासवते मात्र तिथून पुढचा सर्व कारभार दलालच करत असतात.

कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये नुकताच असाच एक गुन्हा दाखल झाला असून यामध्ये सुद्धा फिर्यादीने दिलेल्या तक्रारीत सोशल मीडियावरून झालेल्या ओळखी मधून पुढे ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रकार घडत असल्याची फिर्याद नोंदवली आहे.

सोशल मीडियाद्वारे फसवणुकीच्या घटना वाढलेल्या असताना एखाद्या व्यक्तीला हेरून मैत्रीच्या जाळ्यात (हनी ट्रॅप) अडकविण्याच्या घटनाही पुन्हा घडू लागल्याने सायबर सुरक्षेचा प्रश्न अधोरेखित झाला आहे. फायद्यासाठी व्यक्तीला निवडून त्याच्या आवडीनिवडी जाणून लक्ष्य केले जात असल्याने समाजातील प्रतिष्ठित नागरिकांना समाजमाध्यमांत वावरताना काळजी घ्यावी लागणार आहे.

या प्रकारांना आळा घालण्यासाठी बदनामीच्या भीतीने तक्रार नको, अशी मानसिकता बाळगण्याऐवजी पीडित लोकांनी तक्रार दाखल करण्यासाठी त्वरित पुढे यावे, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे. तक्रारदारांची संख्या वाढत असली, तरी बदनामीच्या भीतीने तक्रार दाखल न करणाऱ्यांचे प्रमाण अधिक असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. अश्लील फोटो आणि व्हिडिओची भीती दाखवून खंडणीची धमकी देण्याचे प्रकार वाढल्याने अनोळखी ‘फ्रेंड रिक्वेस्ट’पासून सावध राहा, असा सल्ला सायबर पोलिस आणि सायबरतज्ज्ञांनी दिला आहे.

‘सेक्सटॉर्शन’च्या प्रकारात एकावेळी अनेकांशी संवाद साधला जातो. वैयक्तिक आणि लैंगिक संवाद साधून तरुणांना जाळ्यात ओढले जाते. त्यांची छायाचित्रे आणि दृश्यफितींमध्ये फेरफार करून ती प्रसारित करण्याची धमकी दिली जाते. त्याबदल्यात खंडणीची मागणी केली जाते त्यामुळे अनोळखी व्हाट्सअप कॉल आणि फेसबुक वरून अनोळखी रिक्वेस्ट स्वीकारताना विचार करूनच स्वीकारा अन्यथा आयुष्य बरबाद होऊ शकते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version