अहमदनगर दि.५ ऑगस्ट
केडगाव उपनगर परिसरात प्रभाग १६ मधील रस्त्यांची दुरवस्था झाली होती. गेल्या १५ वर्षात या रस्त्यांकडे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली होती. त्यामुळे महापालिकेत शिवसेनेची सत्ता आल्यावर महापौर रोहिणी शेंडगे यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यांनी शासनाकडून उपलब्ध झालेल्या १५ कोटींच्या निधीतून ५ कोटी रुपये या रस्त्यांसाठी मंजूर केले आहेत. लवकरच निविदा प्रक्रिया होऊन ही कामे मार्गी लागतील, अशी माहिती नगरसेवक विजय पठारे यांनी दिली.
महापालिकेत शिवसेनेचा महापौर झाल्यानंतर तत्कालीन नगरविकास मंत्री व सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगर शहरात रस्त्यांच्या कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर केला. महापौर रोहिणी शेंडगे यांनी यासाठी पाठपुरावा केला. १५ कोटींच्या निधीतून केडगाव येथील झेंडा चौक ते वैष्णवनगर, भूषणनगर येथे राधेश्याम कॉम्प्लेक्स ते फुंदे घर, अयोध्यानगर चौक ते शंभूराजे चौक, रभाजीनगर सापते घर ते पवन कोतकर घर, मुरकुटे घर ते नेप्ती रोड या रस्त्यांची कामे मंजूर करण्यात आली आहेत. या कामांना प्रशासकीय मान्यताही देण्यात आली. तसेच, शासनस्तरावरील स्थगितीही महापौर शेंडगे यांनी पाठपुरावा करून उठवली आहे. या कामांच्या निविदाही प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यामुळे लवकरच ही कामे मार्गी लागणार आहेत.
प्रभागातील पथदिवे, ड्रेनेज, रस्त्यांच्या समस्या टप्प्याटप्प्याने सोडवत आहे. १५ वर्षांपासून काही रस्त्यांची कामे झालेली नव्हती. त्यासाठी निधी मंजूर करून आणला आहे. इतरही कामांसाठी महापौर रोहिणी शेंडगे यांच्या माध्यमातून आणखी निधी उपलब्ध होत आहे. प्रभागातील पाण्याची समस्याही बऱ्याचअंशी मार्गी लावली आहे, असेही नगरसेवक विजय पठारे यांनी सांगितले.