Home राजकारण महाविकास आघाडी जागा वाटपात नगर शहर मतदार संघावर अन्याय निष्ठावंत माजी महापौर...

महाविकास आघाडी जागा वाटपात नगर शहर मतदार संघावर अन्याय निष्ठावंत माजी महापौर भगवान फुलसौंदर प्राध्यापक शशिकांत गाडे यांची निष्ठा कधी फळाला लागणार !

अहिल्यानगर दि.९ नोव्हेंबर

अहील्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा,पारनेर आणि नगर मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेवर अन्याय झाल्याची भावना निष्ठावंत शिवसैनिकांची झाली असून श्रीगोंदा मतदारसंघात काही तासांपूर्वी पक्षात आलेल्या अनुराधा नागवडे यांना तिकीट दिल्यामुळे त्या ठिकाणी शिवसैनिक नाराज आहेत. पारनेर मतदारसंघात खासदार निलेश लंके यांच्या पत्नीला तिकीट जाहीर झाल्यानंतर थेट उपजिल्हाप्रमुखांनी बंडखोरीचे निशाण फडकवत अपक्ष उमेदवारी दाखल करत संदेश कार्ले यांनी पक्षाला थेट इशारा दिला आहे. तर नगर शहर मतदारसंघात शिवसेनेची ताकद असताना या ठिकाणी अभिषेक कळमकर यांना राष्ट्रवादीचा काँग्रेस शरदचंद्रपवार यांच्या पक्षाने उमेदवारी जाहीर केल्यामुळे नगर शहरातील निष्ठावंत शिवसैनिक नाराज झाले होते. निष्ठावंत शिवसैनिकांच्या बैठकीत थेट उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांच्या निषेधाच्या घोषणाही देण्यात आल्या होत्या.

नगर शहरात शिवसैनिकांचे बंड थंड झाले असले तरी खदखद मात्र कायम आहे. अनेक वर्ष पक्षाशी एकनिष्ठ राहिलेले शशिकांत गाडे आणि माजी महापौर भगवान फुलसौंदर यांच्यावर पक्षाने निश्चितच अन्याय केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नगर शहरात पक्ष जिवंत ठेवण्यासाठी प्राध्यापक शशिकांत गाडे यांचे मोठे योगदान आहे. तर माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनीही आपल्या पक्षाबाबत एकनिष्ठता दाखवत अनेक वेळा आलेले प्रलोभने डावलली आहेत. मात्र तरीही पक्षाने नगर शहर शिवसेनेत इच्छुक असलेले प्राध्यापक शशिकांत गाडे आणि एकनिष्ठ असलेले माजी महापौर भगवान फुलसौंदर यांच्याबाबत विचार न करणे ही एक मोठी खेदाची बाब असल्याचं शल्य शिवसैनिकांमध्ये आहे.

नगर शहरात महायुतीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार संग्राम जगताप यांना कडवी टक्कर देणारा चेहरा म्हणून माजी महापौर भगवान फुलसौंदर यांचे नाव मोठ्या चर्चेत होते मितभाशी आणि राजकीय संबंधापलीकडे भगवान फुलसौंदर यांचे नगर शहरातील विविध पक्षातील नेत्यांशी तसेच मतदारांशी चांगले संबंध होते.एकनिष्ठ शिवसैनिक आणि कोरी पाटी म्हणून भगवान फुलसौंदर निश्चितच महायुतीच्या उमेदवाराला टक्कर देणारे एक उमेदवार म्हणून या निवडणुकीच्या आधी चांगले चर्चेत होते मात्र भगवान फुलसौंदर यांच्यासारख्या निष्ठावांत शिवसैनिकांचा विचारही न करणे हे पक्षाला आता कितपत तोट्याचे ठरणारे हे आगामी विधानसभेच्या निवडणूक निकालातून दिसून येऊ शकते.

प्राध्यापक शशिकांत गाडे, माजी महापौर भगवान फुलसौंदर यांच्यासारखे निष्ठावंत शिवसैनिक आज जरी महाविकास आघाडी बरोबर असले तरी निष्ठावंत शिवसैनिकांना हे शल्य नेहमीच राहणार आहे की हक्काची शिवसेनेची जागा आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडे गेली आहे. भविष्यात शिवसेनेला ही जागा पुन्हा घेण्यासाठी झगडावे लागणार आहे. गेल्या 30 वर्षांपासून नगर शहरावर शिवसेनेचा भगवा दिमाखाने डौलत असताना राजकीय वाटाघाटीत निष्ठावंत शिवसैनिकांचा बळी दिला गेला आहे. शिवसेनेचा भगवा महानगरपालिकेवर आणि विधानसभेवर शिवसेनेच्या माध्यमातून अखंडपणे डौलत होता मात्र आता हा भगवा पुन्हा फडकवण्यासाठी शिवसैनिकांना संघर्ष करावा लागणार हे निश्चित आहे . मात्र जर विधान परिषदेवर प्राध्यापक शशिकांत गाडे अथवा माजी महापौर भगवान फुलसौंदर यांना संधी दिल्या गेल्यास निश्चितच शिवसेनेचा भगवा पुन्हा एकदा नगर शहरावर फडकू शकतो. त्यामुळे आगामी काळात या दोघांपैकी एखाद्याला विधान परिषदेची संधी द्यावी अशी मागणी ही शिवसैनिकांमधून होत आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version