अहिल्यानगर दिनांक 29 डिसेंबर
अहिल्यानगर महानगरपालिकेची निवडणुकीची अर्ज भरण्याची धामधूम शेवटच्या दिवसापर्यंत आली आहे. मात्र अजूनही महायुती आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार जाहीर झालेले नाहीत त्यामुळे सर्व ठिकाणी संभ्रम निर्माण झालेला आहे.

महायुती मधील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गट यांच्यामधील चर्चेच्या फेऱ्या संपता संपेना असे झाले आहे. त्यामुळे दर एक तासाला नवनवीन अफवा सोशल मीडियावर व्हायरल होत असून यामुळे इच्छुक उमेदवारांची मात्र मोठी तारांबळ होत आहे. प्रत्येक क्षणाक्षणाला नवीन नवीन बातम्या पसरत असल्यामुळे आपणच उमेदवार राहू का नाही असा संभ्रम अनेक इच्छुक उमेदवारांमध्ये निर्माण झाला आहे.
अर्ज भरण्याची शेवटचा दिवस उद्या पर्यंत असल्यामुळे आज अनेक उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. आहेत. मात्र उमेदवारी अर्ज भरताना अनेकांनी दोन दोन ठिकाणावरून तसेच आपल्या पत्नीसह पुरुष उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यामुळे कोणत्या गटात कोणता उमेदवार हे अद्यापही निश्चित झालेले नाही.
आज इच्छुकांनी मोठी गर्दी अर्ज भरण्यासाठी केली होती . तर आज माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी सुद्धा नगर शहरात तळ ठोकला असून जागा वाटपाबद्दल आमदार संग्राम जगताप आणि शिवसेनेच्या नेत्यांबरोबर चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रानुसार मिळाली आहे.
मात्र महायुतीत शिंदे गटाला कमी जागा मिळत असल्याने शिंदे गट आपल्या मागणीवर ठाम असून वेळप्रसंगी वेगळ्या लढण्याचा पर्याय शिंदे गट स्वीकारू शकतो. आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार महायुती मधील चर्चा थांबली असून महायुती मधून शिवसेना शिंदे गट वेगळा निर्णय घेऊन बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती समोर आली आहे. मात्र अधिकृत माहिती आल्याशिवाय यावर शिक्कामोर्तब करता येणार नाही.