अहमदनगर दि. २७ ऑक्टोबर
मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी म्हणून जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा अंतरवाली सराटी या ठिकाणी आमरण उपोषण सुरू केले आहे म्हणून मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रभर सध्या विविध ठिकाणी आंदोलन आणि उपोषण मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सुरू करण्यात आली आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण चालू केल्यानंतर अनेक ठिकाणी आता राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आहे तर अनेक आमदार खासदारांना मराठा समाजाने जाब विचारण्यासाठी त्यांना घेरावो आंदोलन सुरू केले आहे. अहमदनगर शहरातही मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर गेल्या तीन दिवसांपासून साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे या साखळी उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणी करता अहमदनगर महानगरपालिकेचे सर्वच मराठा नगरसेवक उद्या या उपोषण स्थळी भेट देऊन पाठिंबा जाहीर करून सहभाग नोंदवणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली आहे.
शहरातील विविध राजकीय नेत्यांनी आपले राजकीय जोडे बाजूला ठेवून समाजासाठी एकत्रितपणे सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाच्या या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहनही करण्यात आले आहे.