अहमदनगर दि.५ मे
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली आहे. शरद पवार यांनी अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा भूकंप झाला आहे. कारण एकीकडे लोकसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे.त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुका आहेत. तसेच राज्यातील सत्तांतरांचा बाबतीत टांगती तलवार असल्याने शरद पवार यांच्या राजीनाम्यामुळे अनेक चर्चांना उधान आले होते.शरद पवार यांनी आपला राजीनामा मागे घ्यावा म्हणून राष्ट्रवादीच्या सर्वच वरिष्ठ नेत्यांसह तळागाळातील कार्यकर्त्यांनी त्यांना गळ घातली आहे.काही कार्यकर्त्यांनी आपल्या रक्ताने पत्र लिहून शरद पवार यांना विनंती करून पुन्हा शरद पवारच हवेत असं सांगितलं होत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक मातब्बर नेते आमदार खासदार सध्या मुंबईमध्ये तळ ठोकून आहेत. शरद पवार यांना विचार करण्यासाठी दोन दिवसाचा वेळ देण्यात आला होता. ती वेळ आता संपत आली असून उद्या महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय होणार आणि राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कोणाचं नाव येणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.
अहमदनगर शहराचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी या बाबत बोलताना विश्वास व्यक्त केलाय की शरद पवार हेच पुन्हा एकदा सर्वांच्या विनंतीला मान देऊन राष्ट्रीय अध्यक्षपदी राहतील अनेक वर्षांपासून तळागाळातील कार्यकर्त्यांना मोठी संधी देऊन शरद पवार यांनी मोठ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. कालपासून संपूर्ण महाराष्ट्रात जे चित्र पाहायला मिळतंय त्यावरून शरद पवार यांच्यावर लोकांचं आणि कार्यकर्त्यांचं किती प्रेम आहे हे समोर आले आहे. शरदचंद्रजी पवार आणि राष्ट्रवादी एक वेगळं समीकरण असून या दोन्ही नावांमुळेच कार्यकर्त्यांना लढायला बळ मिळत असल्यामुळे त्या प्रेमाच्या ताकदीने शरद पवार हेच पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी राहतील असा ठाम विश्वास संग्राम जगताप यांनी व्यक्त केला आहे.