अहमदनगर दि.५ मे
अहमदनगर महापालिकेच्या बांधकाम विभागात शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या नावे साडेचारशे खोटे टेस्ट रिपोर्ट व खोटे थर्ड पार्टी रिपोर्ट दाखल करून घेत त्याच्या आधारे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांची देयके काढल्याचा व यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेनेच्या चंद्रकांत उर्फ काका शेळके यांनी केला आहे. माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार शेळके यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन देऊन बांधकाम विभागाकडील सर्व टेस्ट रिपोर्ट व थर्ड पार्टी रिपोर्टची चौकशी करण्याची मागणी केली आहे. चौकशी होईपर्यंत सर्व संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांचे पगार व इतर देयके तत्काळ थांबवण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
शेळके यांनी माहिती अधिकार अर्जाद्वारे १ मार्च २०१६ ते १६ ऑक्टोबर २०२० च्या कालावधीतील बांधकाम विभाग अंतर्गत सर्व कामांचे टेस्ट रिपोर्ट व थर्ड पार्टी रिपोर्टची मागणी केली होती. ही माहिती न मिळाल्याने अपिल केले. तरी देखील माहिती मिळाली नाही. त्यानंतर शेळके यांनी राज्य माहिती आयोगाकडे तक्रार दाखल केली. यावर ६ डिसेंबर २०२२ रोजी राज्य माहिती आयोगाची सुनावणी झाली. त्यानंतर २६ एप्रिल २०२३ रोजी सर्व माहितीची कागदपत्रे मनपाने मोफत दिली. या कागदपत्राद्वारे १ मार्च २०१६ ते १६ ऑक्टोबर २०२० या कालावधीतील ७७८ टेस्ट रिपोर्ट व ८६ थर्ड पार्टी रिपोर्ट बांधकाम विभागाकडे उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली. हे सर्व रिपोर्ट शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय यांच्याद्वारे प्रमाणित असलेले आहेत. तसेच, याच कालावधीतील तीच माहिती शेळके यांनी दि. १९ ऑक्टोबर २०२० रोजी माहिती अधिकार अर्जाद्वारे शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाकडे मागितली असता त्यांनी १० नोव्हेंबर २०२० रोजी त्यांनी सर्व माहिती दिली. त्यानुसार त्यांनी ३२९ टेस्ट रिपोर्ट दिले व एकही थर्ड पार्टी रिपोर्ट दिला नाही, असे स्पष्ट केले आहे. यावरून नगर महापालिकेकडे असलेले सर्व थर्ड पार्टी रिपोर्ट हे बनावट असल्याचे स्पष्ट होते.
तसेच, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाने ३२९ टेस्ट रिपोर्ट दिलेले आहेत. असे असताना आपल्या मनपाकडे ७७८ टेस्ट रिपोर्ट आले कुठून, असा सवाल उपस्थित होत आहे. दोन्हीबसंस्थांकडील उपलब्ध माहितीनुसार सुमारे ४४९ टेस्ट रिपोर्ट खोटे असल्याचे स्पष्टपणे दिसून येते, असा दावा शेळके यांनी केला आहे.
मोठ्या प्रमाणात खोटे टेस्ट रिपोर्ट मनपाच्या बांधकाम विभागात दाखल झाल्याने व त्या आधारावर मनपाच्या बांधकाम विभागाकडून कोट्यवधी रुपयांची देयके
अदा केली गेली आहेत. यातून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येते. या सर्व प्रकारची चौकशी करावी. जोपर्यंत सदर प्रकरणाची संपूर्ण चौकशी होत नाही, तोपर्यंत संबंधित कालावधीतील अधिकारी अभियंते, कर्मचारी यांचा पगार तथा इतर देयके थांबवण्यात यावीत. सदर कालावधीतील कामांची ज्या ठेकेदार संस्थांना बिले दिलेली आहेत, त्यांची आताची सर्व देयके तातडीने थांबवावीत. सदर कालावधीतील बांधकाम विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि कॅफो, ऑडिटर तथा याच्याशी निगडीत सर्व व्यक्तींवर ४८ तासात कारवाई न केल्यास आयुक्तांविरुद्ध न्यायालयात दाद मागण्यात येईल, असा इशाराही काका शेळके यांनी दिला आहे.