अहमदनगर दि.२२ मार्च
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला घरघर लागली असून एकेकाळी किंगमेकर ची भूमिका राबवणाऱ्या मनसेला ऐन लोकसभेच्या निवडणुकीत धक्क्यावर धक्के बसत आहेत. एका पदाधिकाऱ्याला पक्षाने बडतर्फ केले आहे. तर एक पदाधिकारी पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील झाला आहे. यामुळे लोकसभेच्या या रणधुमाळीत मनसेमध्ये नेमकं चाललाय काय असा प्रश्न पडलाय.
अहमदनगर शहरात मनसे पक्ष स्थापन झाल्या पासून अस्तिवात आहे मात्र पक्षाचे काम म्हणावे तितके जोमात नसल्याने पक्षात गेल्या काही दिवसांपासून अलबेल असल्याचे समोर आल आहे. एका पदाधिकाऱ्याची हकालपट्टी करण्यात आली तर विद्यार्थी सेनेचे जिल्हा संघटक परेश पुरोहित यांनी मनसेची साथ सोडत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. पक्षाने त्यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शहर जिल्हा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे. अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष संपत बारस्कर यांच्या उपस्थितीत परेश पुरोहित यांचा प्रवेश झाला.
निवडणुकीच्या धामधुमीत मनसेला लागलेली ही गळती निश्चितच पक्षासाठी चांगली नाही.
मनसेमध्ये सुमित वर्मा नेहमीच काही ना काही सामाजिक कार्यात आणि अहमदनगर शहरातील महत्त्वाच्या प्रश्नांवर वाचा फोडून नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कार्यरत असतात मात्र आता पुढील काळात विधानसभा महानगरपालिका जिल्हा परिषद अशा विविध निवडणुका येणार असल्यामुळे मनसेने आता कात टाकून काम करणे गरजेचे आहे तरच मनसेचे अस्तित्व मतदारांच्या लक्षात येईल.
अहमदनगर शहरात मनसे नेहमीच सत्ताधाऱ्यांच्या विरोधात विविध प्रश्नांसाठी उभी ठाकली आहे. मात्र आता राज्यातील नवीन समीकरणानुसार मनसे महायुती बरोबर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे त्यामुळे आता नगरच्या मनसे पदाधिकारी काय भूमिका घेणार याकडेच आता लक्ष लागून आहे.