अहमदनगर दि.१३ जानेवारी
: नाशिक पदवीधर निवडणुकीमध्ये शेवटच्या क्षणी विद्यमान आ. डॉक्टर सुधीर तांबे यांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने उमेदवारी घोषित होऊन एबी फॉर्म देखील देण्यात आला होता. मात्र, त्यांनी फॉर्मच भरला नाही. त्यावरून काँग्रेस श्रेष्ठींनी तांबे पिता-पुत्रांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यातच आता अहमदनगर जिल्ह्यातील प्रा. सुभाष चिंधे यांनी काँग्रेस, महाविकास आघाडीने या निवडणुकीसाठी मला पुरस्कृत करावे, अशी मागणी करणार असल्याचे म्हटले आहे.
प्रा. चिंधे यांनी या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. छाननी प्रक्रियेमध्ये तो वैध ठरवण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला आहे. चिंधे हे गेल्या 20 वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून प्राध्यापक म्हणून सेवा करत आहेत. महाराष्ट्र राज्य हिंदी अध्यापक संघटनेच्या पुणे विभागाचे ते उपाध्यक्ष आहेत. तसेच, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष देखील आहेत. प्रा. चिंधे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, मागच्याही टर्म वेळी मी पदवीधर निवडणुकीसाठी प्रयत्नशील होतो. मागील तीन वर्षांपासून मी अहमदनगरसह नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगावचा दौरा करत सर्व भाग पिंजून काढला आहे. माझा शिक्षक वर्गासह वकील, डॉक्टर आणि एकूणच पदवीधरांमध्ये मोठा जनसंपर्क आहे. मी मोठ्या संख्येने पदवीधर नावनोंदणी देखील केली आहे. मला काँग्रेस, महाविकास आघाडीने पुरस्कृत करावे, अशी मागणी करणार आहे. त्यासाठी मी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार मल्लिकार्जुन खर्गे, महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना निवेदन देणार आहे. माझी वैयक्तिक तयारी आणि काँग्रेस सह शिवसेना, राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीशी समविचारी असणार्या संघटना यांच्या पाठिंब्याने मी ही निवडणूक नक्कीच जिंकू शकेल, असा मला पूर्ण विश्वास आहे. दरम्यान, प्राध्यापक चिंधे यांनी नगर शहरापासून आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. सत्यजित तांबे हे देखील अहमदनगर जिल्ह्याचे आहेत. सर्वात जास्त नावनोंदणी ही अहमदनगर जिल्ह्यातच झाली आहे. चिंधे यांची मागणी गांभीर्याने काँग्रेसने घेतल्यास आणि अशा काही घडामोडी घडल्यास तांबे यांना नगर जिल्ह्यातूनच शह देण्याची खेळी खेळली जाऊ शकते, अशी चर्चा प्राध्यापक शिंदे यांच्या मागणीनंतर जिल्ह्यासह नाशिक पदवीधर मतदारसंघातील सर्वच भागांमध्ये सुरू झाली आहे. त्यामुळे 16 तारखेपर्यंत अर्ज माघारीच्या मुदतीपर्यंत जर काही चमत्कारिक घडामोडी घडल्या तर ही निवडणूक अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे.त्यातच प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी काल रात्री उशिरा तांबे पिता-पुत्रांनी पक्षाच्या शिस्तीचा भंग केल्याबद्दल चर्चा केल्याची माहिती समोर आली असून, हायकमांडच्या पुढील आदेशाप्रमाणे पक्ष उचित कारवाई करेल, असे पटोले यांनी सांगितले आहे. त्यामुळे तांबेंवरील काँग्रेसची कारवाई अटळ मानली जात आहे. त्यातच तांबेंना शह द्यायचा असेल तर नगर जिल्ह्यातूनच काँग्रेसला खेळी खेळावी लागणार आहे. चिंधे यांनी यामुळे काँग्रेसकडून पुरस्कृत होण्यासाठी केलेला दावा हा महत्त्वपूर्ण मानला जात आहे.