मुंबई दिनांक 15 जून
पॅनकार्ड क्लब लिमिटेडमध्ये गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली आहे. या गुंतवणूकदारांना त्यांचा पैसा परत मिळाला पाहिजे, यासाठी गृह विभागाने सेबी, एनसीएलटी यांच्या समन्वयाने सर्व कायदेशीर प्रकिया तातडीने पूर्ण करून गुंतवणूकदारांचा पैसा परत देण्याची कार्यवाही करावी, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या. यावेळी गृह (शहरे) राज्यमंत्री योगेश कदम यांनीही या बाबतीत सर्व पर्यायांचा उपयोग करून गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याच्या सूचना दिल्या.
महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थामधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम १९९९ अन्वये पॅनकार्ड क्लब लि. बाधित गुंतवणूकदारांच्या परतावा प्रक्रियेबाबत मंत्रालयात बैठक झाली.
बैठकीत झालेले निर्णय..
पॅन कार्ड क्लब्ज बाधित १६ लाख गुंतवणूकदारांना लवकरात लवकर परतावा मिळवून देण्यासाठी आढावा बैठकांसह, बाधितांच्या मदतीसाठी गतिमानतेने कार्यवाही करण्याचे निर्देश…
७ हजार, ३५ कोटी पैकी अंदाजे ३ हजार कोटींच्या मालमत्ता संरक्षित करण्यात आल्या असून, बाधितांना लवकरात लवकर परतावा देण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.
प्रत्येक महिन्याला पुनरावलोकनासाठी झालेल्या कामाचा अहवाल सादर करण्यात येणार आहे.
सदर प्रक्रिया गतिमान करण्यासाठी येत्या ३ महिन्यात पुन्हा आढावा बैठक घेण्यात येणार आहे.
या बैठकीस प्रधान सचिव विशेष कार्य व सुरक्षा श्री. अनुप कुमार सिंह, अप्पर पोलीस महासंचालक आर्थिक गुन्हे शाखा श्री. सुरेश मेकला, उपजिल्हाधिकारी (एमपीआयडी), मुंबई शहर श्रीमती स्नेहा उबाळे, महसूल विभागाचे अधिकारी तसेच आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी देखील उपस्थित होते.