नाशिक दिनांक १८ मार्च
बलात्काराच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अशोक खरात उर्फ ‘स्वघोषित कॅप्टन’ याला नाशिक क्राइम ब्रांच युनिट 1 ने अटक केली आहे. संबंधित आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
तपासादरम्यान पोलिसांनी तब्बल ५८ व्हिडिओ जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. या व्हिडिओंमध्ये काही नामांकित महिला व सेलिब्रिटी संबंधित असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
कॅप्टन खरात हा अनेक व्हीआयपी लोकांमध्ये नामांकित असून हात बघून भविष्य अचूक सांगणारा म्हणून त्याची राज्यसह राज्य बाहेरही ख्याती आहे. आजपर्यंत त्याच्याकडे हात दाखवण्यासाठी महाराष्ट्रातील दिग्गज नेते मंडळींनी त्याच्या दरबारात हजेरी लावल्याची उदाहरणे आहेत.
नाशिक शहरातील सरकारवाडा पोलीस ठाण्यात एका पस्तीस वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादी वरून पोलिसांनी या भामट्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी त्याला रात्री उशिरा अटक करण्यात आली. कॅप्टन खरात याने भविष्य दाखवण्याच्या नावाखाली अनेक महिलांचे शारीरिक शोषण केल्याचे लवकरच उघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भविष्य सांगण्याच्या नावाखाली विश्वासात घेऊन तो हा घाणेरडा प्रकार करीत होता आणि त्याच्या दबावाखाली पीडित महिलांनी सर्व सहन केले असावे अशी शक्यता आहे.
पोलिसांकडून जप्त करण्यात आलेल्या व्हिडिओंची सखोल तपासणी सुरू असून, त्यामधून आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास नाशिक क्राइम ब्रांच युनिट एक करीत आहे.
दरम्यान कॅप्टन खरात हा अहिल्या नगर जिल्ह्यात नावाजलेला असून नगर जिल्ह्यात त्याचे अनेक चाहते आहे. तसेच तो अनेक कार्यक्रमांमध्ये ही सहभागी झाल्याची माहिती आहे. त्याची राज्यभरासह शिर्डीत कोट्यावधींची मालमत्ता असल्याचीही खात्रीशीर माहिती मिळाली आहे.
