राहुरी दिनांक 15
राहुरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे अधिकृत उमेदवार अक्षय कर्डिले यांचा प्रचार सध्या शिगेला पोहोचला असून आज राहुरी शहरात झालेल्या प्रचार फेरीला पदाधिकारी व कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. घोषणाबाजी, जल्लोष आणि उत्साहाच्या वातावरणात कर्डिले यांच्या प्रचाराला वेग आला आहे.

*आज प्रत्येक ठिकाणी साहेबांची उणीव जाणवते. गेल्या 30 वर्षांत त्यांनी जनतेची निष्ठेने सेवा केली*
प्रचारादरम्यान बोलताना अक्षय कर्डिले यांनी भावनिक शब्दांत जनतेशी संवाद साधला. साहेबांनी मोठा परिवार तयार केला आहे. आज प्रत्येक ठिकाणी साहेबांची उणीव जाणवते. गेल्या 30 वर्षांत त्यांनी जनतेची निष्ठेने सेवा केली. त्यांनी उभारलेलं कार्य पुढे नेणं हीच माझी जबाबदारी आहे, तुमच्या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही तुम्ही फक्त येणाऱ्या आठ दिवस मला द्या पुढील काळात मी पूर्णपणे तुमचाच आहे असे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले, तुम्ही सर्वांनी माझ्या पाठीशी उभं राहत मला बळ दिलं. गेल्या सहा महिन्यांत तुम्ही मला ज्या पद्धतीने साथ दिली, त्याबद्दल मी ऋणी आहे. 2029 पर्यंत एकही विकासकाम शिल्लक राहणार नाही, याची हमी देतो. ही निवडणूक हलक्यात घेणार नाही; 2024 प्रमाणेच पूर्ण ताकदीने लढणार आहोत. भविष्यात एकही तक्रार राहणार नाही, हा माझा शब्द आहे. जनताच माझे साहेब आहे आणि माझा परिवार आहे, येणाऱ्या विजय हा फक्त साहेबांसाठी आणि जनतेचे काम करण्यासाठी आहे असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, नागरिकांनीही आपल्या भावना व्यक्त करत कर्डिले यांना जोरदार पाठिंबा दर्शवला. कर्डिले साहेब आणि विखे पाटील यांनी मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर विकासकामे केली आहेत. ही निवडणूक केवळ राजकारणाची नसून भावनेची आहे. आता राजकारण करण्याची वेळ नाही, तर अक्षय दादांच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याची वेळ आहे, असे मत नागरिकांनी व्यक्त केले. माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी माघार घेत अक्षय कर्डिले यांच्या पाठीशी उभे राहिल्याने समीकरणे अधिक मजबूत झाली आहेत. 4 तारखेला गुलाल फक्त अक्षय कर्डिले यांचाच उडणार, हे निश्चित आहे, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
एकूणच, राहुरीत अक्षय कर्डिले यांचा प्रचार वेग घेत असून जनतेचा वाढता प्रतिसाद पाहता ही निवडणूक एकतर्फी होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.



