अहमदनगर – दि.३ ऑगस्ट
महाविद्यालयीन तरुणी, महिलांच्या छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी आता पोलिस ठाणे स्तरावर स्वतंत्र दामिनी पथक स्थापन करण्यात आले असल्याची माहिती पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली आहे. महिला व मुलींच्या सुरक्षिततेसाठी पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी मोहीम सुरू केली असून, रोड रोमियोंना आवर घालण्यासाठी कोतवाली पोलिसांचे दामिनी पथक स्थापन करण्यात आले आहे. शाळा-कॉलेजच्या परिसरात या पथकाची गस्त राहणार आहे.
पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शाळा महाविद्यालयांमध्ये भेटी देऊन विद्यार्थिनींच्या अडचणी जाणून घेत आहेत. शाळा तसेच कॉलेजेस मध्ये दिलेल्या भेटीदरम्यान काही विद्यार्थिनींनी त्रास देणाऱ्यांच्या तक्रारी केल्याने संबंधितांवर पोलीस निरीक्षक यादव यांनी तात्काळ कारवाई केली आहे. आता कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या शाळा, कॉलेज, होस्टेल, कोचिंग क्लास आदी ठिकाणी विद्यार्थिनींशी संवाद साधण्यासाठी आणि रोड रोमिओवर कारवाई करण्यासाठी दामिनी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. मुलींच्या अडचणी, प्रश्न दामिनी पथकाकडून जाणून घेण्यात येणार आहेत. विद्यार्थिनींची काही तक्रार असल्यास ती सोडवण्यासाठी दामिनी पथक मदत करणार आहे. त्याबरोबरच ज्या ठिकाणी टुकार मुलं त्रास देतात त्यांचे व्हिडिओ शूटिंग छुप्या कॅमेरातून केली जाणार आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. विद्यार्थिनींना त्रास देणाऱ्या रोडरोमिओंचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी दामिनी पथकावर सोपवण्यात आली आहे. शाळा भरण्याच्या तसेच सुटण्याच्या वेळेत दामिनी पथक गस्त करेल आणि मुलींना कोणी त्रास देत असल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली आहे.
नगर कॉलेज, भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, रूपीबाई बोरा हायस्कूल, अंबिका विद्यालय केडगाव, चांद सुलताना हायस्कूल, गुगळे माध्यमिक विद्यालय, ग ज चीतंबर विद्यालय व इतर शाळा महाविद्यालय तसेच बस स्थानक आणि बाजारपेठ या ठिकाणी कारवाई करण्यात येणार आहे.
……………………………..
निर्भयपणे पोलिसांकडे तक्रार द्या!
शाळा, कॉलेजमध्ये कोणी त्रास दिल्यास संबंधित व्यक्तीची तक्रार निर्भयपणे पोलिसांना द्या, तक्रार आल्यास छेड काढणाऱ्यावर तातडीने कारवाई केली जाईल. तसेच, पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यास बदनामी होईल, या भीतीमुळे काही मुली तक्रार करत नाहीत. त्यामुळे असे न करता त्रास देणाऱ्यांची माहिती पोलिसांना द्या, त्रयस्थ नागरिकांनी सुद्धा माहिती द्यावी तुमचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असेही पोलिस निरीक्षक यादव यांनी सांगितले.
छेड काढणाऱ्यांची अशी करा तक्रार
महीला व मुलींनी मोबाईल वरून विनाकारण मेसेज केल्यास, पाठलाग केल्यास, प्रवासात छेड काढणाऱ्यांची तक्रार पोलिसांना द्यावी. पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या ७७७७९२४६०३ या मोबाईल क्रमांकावर तक्रार करावी, तुमचे नाव गोपनीय ठेवले जाईल.