अहमदनगर दि ३ ऑगस्ट : अहमदनगर महापालिकेच्या नव्याने हद्दवाढ झालेल्या भागात नागरी सोयी सुविधांचा विकास करण्यासाठी महापौर रोहिणी शेंडगे व उपमहापौर गणेश भोसले यांनी शासनाकडे पाठपुरावा केल्याने विशेष अर्थ सहाय्य योजनेअंतर्गत प्रभाग क्र. 4, 5, 15 व 16 मध्ये विकास कामांसाठी 15 कोटी रुपये मंजूर झाले होते, परंतु त्या कामांना स्थगिती देण्यात आली होती, त्यातील काही विकासकामे वगळता प्रभाग क्र. 4, 5, व 16 मधील विकास कामे रद्द करण्यात आली होती.
मात्र महापौर रोहिणी शेंडगे, उपमहापौर गणेश भोसले यांनी या कामासाठी माझ्याकडे पुन्हा पाठपुरावा केला. व मी शासनाकडे रद्द झालेल्या कामांना मंजुरीसाठी पाठपुरावा केला, आता या प्रभागातील रद्द झालेल्या विकास कामांना शासनाकडून पुन्हा मंजुरी मिळवून दिली आहे. त्यामुळे या प्रभागातील रद्द झालेली विकासकामे मार्गी लागून नागरिकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील. या परिसरात नागरी वसाहती झपाट्याने विकसित होत असून त्यांना मुलभूत सुविधा देण्यास कटिबद्ध आहे, विकास कामांना शासनाने पुन्हा मंजुरी दिल्याने लवकरच ही कामे मार्गी लागून या ठिकाणी विकासाला चालना मिळेल असे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले.