अहमदनगर दि.२८ ऑगस्ट
नगर शहरातील विविध भागातील हॉटेलसह रस्त्यांवर विविध खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या गाड्यांवर उघडे खाद्यपदार्थ मोठ्या प्रमाणावर विक्री केले जात आहेत. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या खाद्यपदार्थांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह असून अन्न व औषध विभागासह महापालिका आणि इतर विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विक्रेत्यांची चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
नगर शहराची आणि उपनगर लोकवस्ती झपाट्याने वाढत आहे. त्याबरोबरच व्यावसायीक प्रतिष्ठानांचीही संख्या वाढत आहे. शहरात छोटी हॉटेल, भेळ भंडार, शीतपेयाच्या गाड्यांसह पाणीपुरी, वडापाव, चायनीज विक्री करणाऱ्या हातगाड्यांनी सर्व प्रमुख रस्ते अतिक्रमित केले आहेत. मुख्य रस्त्यावर व चौकाचौकात सकाळी आणि सायंकाळच्या वेळी खाद्यपदार्थांची
दुकाने मोठ्या संख्येने थाटली जातात. मात्र, यातील बहुतांश हॉटेल्स व गाड्यांवर परवान्याविनाच खाद्य पदार्थांची विक्री करत असतात.
काही हातगाडी चालकांकडे परवाने आहेत मात्र अनेक चालकांकडे परवाने नसल्याचाही समोर आले आहे. खाद्य पदार्थाचा थेट संबंध आरोग्याशी असतो. त्यामुळे खाद्य पदार्थांची विक्री करताना अनेक निकषाची पूर्तता करावी लागते. मात्र,
या भानगडीत रस्त्यावर खाद्यविक्री करणारे पडताना दिसत नाहीत. त्यातच आता पावसाळा सुरू झाला असून रोगराई पसरण्याची भीती आहेच. अहमदनगर शहरातील रस्ता रस्त्यांवर उघड्यावरच खाद्यपदार्थांची विक्री केली जाते.
त्याचप्रमाणे विविध ठिकाणी बिर्याणी बनवून विकणारे अनेक दुकाने उघडण्यात आले आहेत.या बिर्याणी विक्री करणाऱ्या व्यवसायिकांकडे खरंच परवाने आहेत का ? आणि परवानगी असल्यानंतर या ठिकाणी सर्व स्वच्छतेचे निकष पाळले जातात का? हेही पाहणे गरजेचे आहे. अनेक परप्रांतीय लोक नगर मध्ये येऊन बिर्याणी हाऊस उघडून व्यवसाय करत आहेत. मात्र त्यांच्याकडून स्वच्छतेचे कोणतेही निकष पाळले जात नसल्याचा अनेक ठिकाणी डोळ्याने दिसून येतेय.
अन्न औषध प्रशासन कार्यालया मध्ये संपूर्ण जिल्ह्याला चारच अधिकारी असल्यामुळे त्यांच्या कामावर मर्यादा येते आणि या किरकोळ विक्रेत्यांकडे लक्ष द्यायला कोणतीच आस्थापना नसल्यामुळे कुणीही कुठेही खाद्य पदार्थांचे दुकान उघडून व्यवसाय करत आहेत मात्र यामुळे आरोग्याची खेळ खेळला जातोय.