अहिल्यानगर दि.24 ऑक्टोबर
महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे जोरात सुरू आहे ही विधानसभा निवडणूक म्हणजे अनेकांची अस्तित्वाची लढाई आहे. महाराष्ट्रात मधल्या काळात झालेल्या राजकीय घडामोडींमुळे सध्या संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. मधल्या काळात झालेल्या घडामोडीनंतर राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती अशा दोन वेगवेगळ्या आघाड्या अस्तित्वात आल्या विशेष म्हणजे कोणीही कधी स्वप्नात पाहिले नव्हते ते पक्ष एकामेकांबरोबर राज्याच्या सत्तेत बसलेले महाराष्ट्राच्या जनतेने पाहिले. आता ही निवडणूक सुरू झाली असून निवडणुकीसाठी 29 तारीख हे अंतिम उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख आहे. मात्र अजूनही महाविकास आघाडी आणि महायुती मधील अनेक जागांवर चर्चा आणि खलबते सुरूच आहेत.
महायुती मधील भाजपने बाजी मारत आपल्या 99 जागा घोषित करून उमेदवारी जाहीर केल्या त्यानंतर अनेक ठिकाणी बंडाचे झेंडेही उभारले गेले त्याचबरोबर इतर पक्षांनीही ज्या ठिकाणी उमेदवारीबाबत घोळ नाही किंवा जास्त दावेदार नाही अशा ठिकाणी उमेदवारी घोषित केल्या. तरीही अद्याप 288 जागांवर उमेदवार जाहीर झालेले नाहीत अनेक जण आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी देव पाण्यात ठेवून उमेदवारीची वाट पाहत बसले आहेत.
अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा मतदारसंघ हा एक सध्या मोठा चर्चेचा विषय ठरला असून तीन महिन्यांपूर्वी झालेल्या श्रीगोंदा येथील एका कार्यक्रमात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जागावाटप नसताना ही जागा उपनेते साजन पाचपुते यांच्या नावाची घोषणा करत उमेदवारी जाहीर केली होती. त्यामुळे सर्वांना एक आश्चर्याचा धक्का बसला होता त्यानंतर बऱ्याच राजकीय घडामोडी झाल्यानंतर खुद्द शरद पवार यांनी ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसची असून त्या ठिकाणी कोणीही उमेदवार जाहीर केला तरी निर्णय हा महाविकास आघाडीचा राहील असे स्पष्ट सांगितले. श्रीगोंदा हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा बालेकिल्ला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत खासदार निलेश लंके यांना मोठी आघाडी श्रीगोंदा तालुक्याने दिली होती त्यामुळे हा मतदारसंघ शरद पवार सोडणार नाही याची खात्री सर्वांनाच होती आणि माजी आमदार राहुल जगताप यांना कामाला लागायचा आदेश खुद्द शरद पवार यांनी दिला होता माजी आमदार राहुल जगताप हे निवडणुकीच्या कामाला लागले आणि उमेदवारी आपल्यालाच मिळेल या आशेवर राहून त्यांनी मतदारसंघ पिंजून काढला होता. मात्र गेल्या तीन दिवसांपासून अचानक या मतदारसंघात अनेक राजकीय घडामोडी घडल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात असलेले राजेंद्र नागवडे आणि त्या पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्ष अनुराधा नागवडे यांनी अचानकपणे आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला आणि रात्रीतून त्यांनी मुंबई येथे मातोश्रीवर जाऊन शिवबंधन बांधले आणि त्या थेट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा अधिकृत उमेदवारी अर्ज घेऊनच श्रीगोंद्याला पोहोचल्या यामुळे श्रीगोंद्याच्या राजकारणात हा एक मोठा भूकंप मानला गेला.माजी आमदार राहुल जगताप यांनी तातडीने सिल्वर ओक गाठून शरद पवार यांच्याबरोबर चर्चाही केली मात्र तोपर्यंत इकडे अनुराधा नागवडे या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार म्हणून जाहीर झाल्या होत्या त्यामुळे श्रीगोंद्याच्या राजकारणात खासदार संजय राऊत यांनी करून दाखवलं तर ऐनवेळी शरद पवार गप्प का बसले हा प्रश्न ही आता समोर आलेला आहे शिवसेनेची ताकद नसताना हा मतदारसंघ शिवसेनेला का दिला गेला आणि मोठ्या प्रमाणात शरद पवार यांना मानणारा वर्ग या ठिकाणी असताना हक्काची जागा का सोडली गेली याबाबत आता चर्चेला चांगलेच उधाण आले आहे.
या मतदारसंघात महायुतीकडून प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी जाहीर झाली आहे मात्र त्यांची सुद्धा उभा राहण्याची इच्छा नसून त्यांनी आपला मुलगा विक्रम पाचपुते यांना उमेदवारी मिळावी यासाठी बरेच प्रयत्न केले होते मात्र भाजपा पक्षश्रेष्ठींनी प्रतिभा पाचपुते यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे यावर्षी श्रीगोंदा मतदारसंघात दोन महिलांसह अपक्ष असलेल्या सुवर्णा पाचपुते या तीन महिलांची लढत पाहायला मिळणार आहे.मात्र आता माजी आमदार राहुल जगताप यांच्या भूमिकेकडेही सर्वांचे लक्ष लागले असून ते काय भूमिका घेतात यावरच या निवडणुकीचे गणिते ठरणार आहे.
या सर्व घडामोडींमुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी करून दाखवलं असंच म्हणता येईल तर शरद पवार यांनी नेमकी कोणती खेळी खेळून हा मतदार संघ सोडला याबाबत चर्चांना उधान आले आहे.