अहमदनगर दि २४ जून
– नगर शहरात हिंदुऋदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानुसार शिवसेना उपनेते स्व. अनिल भैया राठोड यांनी शिवसेना रुजवली आहे. नगरचे सर्व व शिवसैनिक, पदाधिकारी, नगरसेवक हे कायम पक्षाच्या व मातोश्रीच्या आदेशानुसारच भूमिका घेतात. राज्यात सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीवर पक्षप्रमुख व मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे साहेब हे निर्णय घेतील. मातोश्रीवरून जी भूमिका जाहीर होईल, तीच नगर शहर शिवसेनेचे भूमिका राहील. मात्र, जोपर्यंत भूमिका जाहीर होत नाही, तोपर्यंत शिवसैनिकांनी संयम बाळगावा. कुठल्याही प्रकारची जाहीर वक्तव्ये समाजमाध्यमातून अथवा मीडियाच्या माध्यमातून करू नयेत.
शिवसेनेने कायम संघर्षाच्या भूमिकेतून वाटचाल केलेली आहे. त्यामुळे संघर्ष शिवसेनेला नवीन नाही. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानुसार सर्वसामान्यांसाठी काम करताना शिवसेनेने कायम लढा दिला आहे. शिवसेनेतील प्रत्येक शिवसैनिक हा लढाऊ वृत्तीचा आहे. शिवसेनेतून यापूर्वीही अनेकांनी बंड केलेले आहेत. त्यांना त्याची किंमत मोजावी लागलेली आहे. सध्याच्या निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत शिवसैनिकांनी एकत्र रहाणे आवश्यक आहे. पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहाणे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी साथ देणे, ही सर्व शिवसैनिकांची, आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.
राज्यातील परिस्थितीबाबत ‘मातोश्री’वरून जी भूमिका जाहीर होईल, त्यानुसार पुढे निर्णय घेतला जाईलच. मात्र, तोपर्यंत कोणीही शिवसैनिक, नगरसेवकांनी पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी, संपर्कप्रमुख, यांच्याबाबत चुकीच्या भावना समाजमाध्यमातून किंवा मीडियाच्या माध्यमातून जाहीरपणे व्यक्त करू नयेत. ज्या कोणा शिवसैनिकांना काही म्हणणे सादर करायचे असेल, भावना व्यक्त करायच्या असतील, त्यांनी वरिष्ठांकडे जाऊन आपल्या भावना व्यक्त कराव्यात. जाहीरपणे कोणतीही टीकाटिपणी करून पक्षाच्या शिस्तीला तडा जाईल, अशी कृत्ये करू नयेत. सर्वांनी संयम बाळगावा. नगरसेवक मदन आढाव यांनी संपर्क प्रमुखांबाबत जाहीरपणे जे वक्तव्य केले, ते पक्ष शिस्तीला धरून नाही. अशा प्रकारे पक्षातील अंतर्गत बाबी चव्हाट्यावर आणणे योग्य नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे साहेब व पक्षश्रेष्ठींकडून, ‘मातोश्री’कडून जे आदेश येतील, त्यानुसार पुढील भूमिका घेतली जाईल.