अहमदनगर दि.३० नोव्हेंबर
अहमदनगर महानगरपालिकेतील सर्वसाधारण सभेत 32 कोटी रुपये देऊन स्मशानभूमी आणि दफनभूमी साठी जमीन घेण्याच्या निर्णयानंतर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून या प्रस्तावाला शिवसेना शिंदे गट तसेच शिवसेना उद्धव ठाकरे गटातील विक्रम राठोड,नागरसेवक बाळासाहेब बोराटे, अमोल येवले, मदन आढाव तसेच भारतीय जनता पार्टीतील नगरसेवक प्रदीप परदेशी काँग्रेसचे नगरसेवक आसिफ सुलतान, शिलाताई दीप चव्हाण यांनी विरोध केला आहे.
आता या प्रश्नावर काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली असून काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसची भूमिका मांडली आहे. महानगरपालिकेला काँग्रेसच्या वतीने एक पत्र देऊन पंधरा दिवसात पुन्हा एकदा सर्वसाधारण सभा घेऊन त्या सभेत हा प्रस्ताव मांडावा आणि सर्व पक्षीय नगरसेवकांनी याला विरोध करून हा प्रस्ताव विखंडित करावा अशी मागणी केली आहे. तसेच या प्रस्तवास काँग्रेसच्या नगरसेवकांनी पाठिंबा दिला तर त्या नगरसेवकांना येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे तिकीट देणार नाही अशी भूमिका त्यांनी जाहीर केली आहे.
तर जे नगरसेवक या प्रस्तावाला पाठिंबा देतील त्या सर्वच नगरसेवकांच्या घरासमोर बोंबाबोंब आंदोलन करून त्यांच्या प्रभागात याबाबतचे माहिती पत्रके वाटण्यात येतील असा इशारा किरण काळे यांनी पत्रकार परिषद बोलताना दिला आहे.