Home Uncategorized राज्याच्या राजकारणात झालेले भूकंप आणि नगर शहरातील राजकारण… नगर शहरातील राष्ट्रवादी विरोधी...

राज्याच्या राजकारणात झालेले भूकंप आणि नगर शहरातील राजकारण… नगर शहरातील राष्ट्रवादी विरोधी सर्वच पक्ष ही भूमिका आता बदलणार का?

अहमदनगर दि.६ जुलै

महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात 2019 पासून मोठ-मोठे भूकंप होत आहेत. या भूकंपाचा परिणाम स्थानिक पातळी पर्यंत पोहचत नाही तोच पुन्हा नवीन भूकंप झाल्यामुळे खालच्या फळीतील नेते,कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात आहेत. 2019 ची निवडणूक ही खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील राजकारणाला कलाटणी देणारी ठरली ज्या गोष्टीची कधीही कल्पना केली नाही ती गोष्ट 2019 नंतर घडली निवडणूक झाल्यानंतर सत्ता स्थापनेसाठी झालेले दिरंगाई यामध्येच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याची घोषणा त्यानंतर भाजप सेना युती तुटणे आणि पुरोगामी विचार आणि प्रखर हिंदुत्व विचार असणाऱ्या शिवसेना बरोबर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची महाविकास आघाडी सत्तेवर येणे ही सर्व राजकीय समीकरणे 2019 मध्ये झाल्यानंतर खालच्या पातळीवर येण्यासाठी काहीसा कालावधी लागत असतानाच कुठेतरी स्थानिक कार्यकर्ते जुळाजवळ करून घेत असतानाच पुन्हा राज्याच्या राजकारणात भूकंप झाला. आणि शिवसेनेतून शिंदे गट फुटून भाजपबरोबर सत्तेमध्ये आला या धक्क्यातून महाराष्ट्र सावरत नाही तोच पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून तेही शिंदे सेना आणि भाजप बरोबर सत्तेमध्ये सहभागी झाले हे सर्व राजकारण होत असताना स्थानिक पातळी मधील धक्का अजूनही स्थानिक कार्यकर्त्यांना पचवता आला नाही.

अहमदनगर शहरात राज्याच्या उलट सत्ता समीकरणे होत असतात हा इतिहास आहे. ज्यावेळी राज्याच्या सत्तेत भाजप राष्ट्रवादी विरोधी असताना महानगरपालिकेत पहिला प्रयोग भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र येण्याचा झाला त्यानंतर महाविकास आघाडी आल्यानंतर महानगरपालिकेच्या सत्तेत पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना एकत्र आले. मात्र हे सर्व होत असताना ही सर्व सत्तेचे गणित होते मात्र स्थानिक नेते आणि कार्यकर्ते अद्यापही एकत्र आले नसल्याचे चित्र नगर शहरात दिसून येत आहे.

महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर अहमदनगर शहरात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते कधीच एकत्र दिसले नाहीत उलट शिवसेनेचे आणि काँग्रेसचे पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींवर टीका करण्याचे चित्र नेहमीच दिसून आलं त्याचप्रमाणे काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना लक्ष केल्याचं दिसून आलं. त्यानंतर शिंदे गट शिवसेनेतून फुटल्यानंतर शहरात शिवसेनेचे दोन गट झाले मात्र हे दोन्ही गट राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधातच असल्याचे चित्र वारंवार दिसून येत आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असो किंवा बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना म्हणजेच शिंदे गट असो या दोन्ही गटाचे पदाधिकारी राष्ट्रवादीच्या विरोधात उभे ठाकलेले नेहमीच दिसून आले. तर राज्यात महाविकास आघाडी असूनही काँग्रेसचे एक गट राष्ट्रवादीच्या विरोधात नेहमीच उभा ठाकलेला दिसला शहरात आजपर्यंत कोणत्याच कार्यक्रमाला महाविकास आघाडी एकत्र दिसून आली नाही. अहमदनगर मध्ये सर्व राजकीय पक्ष मिळून राष्ट्रवादी विरोधी असल्याचे चित्र नेहमीच दिसून येत मात्र राज्याच्या राजकारणात उलथापालक झाल्यानंतर वरिष्ठ पातळीवर सर्व एकत्र असताना स्थानिक नेते मात्र उघडपणे एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले दिसून आले.

नगर शहरात पक्ष जरी वेगवेगळ्या असले तरी राजकीय नेते आपापल्या पद्धतीने आपले राजकारण साधून घेण्यासाठी अंधारात सर्वच पक्षांबरोबर असतात त्यामुळे नगर शहरात शिवसेनेला याचा मोठा फटका मागील विधानसभा निवडणुकीत बसला होता. त्यामुळे नगर शहरातील शिवसेनेची ताकद कमी होत गेली जोपर्यंत शिवसेना एक संघ होती तोपर्यंत नगर शहरात शिवसेनेची मोठी ताकद होती महानगरपालिका निवडणूक असो किंवा विधानसभा निवडणुकीत असो शिवसेना एक नंबर वर राहत असे मात्र मागील विधानसभा निवडणुकीपासून शिवसेनेमध्ये झालेली दुफळी अद्यापही एक झालेली नसल्याचे चित्र पाहायला मिळते

आता पुन्हा राज्याच्या राजकारणात भूकंप झाल्यानंतर शहरातील भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. कारण यापूर्वीचे शिवसेना नेते असेल किंवा शिंदे गटातील नेते असतील सर्वांनी उघडपणे राष्ट्रवादी विरोधी भूमिका घेतली होती आता अजित पवार यांची राष्ट्रवादी सत्तेत सहभागी झाली असून अहमदनगर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोकप्रतिनिधींनी अजित पवार यांच्या पाठीशी उभा राहण्याची भूमिका घेतल्यामुळे तेही सत्तेत सामील झाले आहेत.त्यामुळे आता भारतीय जनता पार्टी नगर शहरात काय भूमिका घेणार की पुन्हा सर्व पक्ष मिळून राष्ट्रवादी विरोधी भूमिका सुरूच राहणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

त्याचप्रमाणे काही महिन्यांवर येऊन ठेपलेली महानगरपालिकेचे गणितही या सर्व युतींवर आघाडीवर अवलंबून आहे. नगर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस वगळता सर्वच पक्षांमध्ये गटबाजीचे ग्रहण लागलेले आहे. त्यामुळे या दुहीचा फायदा कोण घेणार आणि पुढील राजकीय गणिते कसे असणार हे येणारा काळच ठरवेल.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version