काँग्रेसला डावल्यामुळेच महाविकास आघाडीचा पराभव, प्र.शिवसेना शहरप्रमुखांचा आडमुठेपणा भोवला – उपाध्यक्ष अनंतराव गारदे ;*
*काँग्रेसच्या आरोपामुळे खळबळ
अहमदनगर : मनपा पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडी उमेदवाराचा पराभव झाला. ही निश्चितच खेदाची बाब आहे. पण हा पराभव केवळ प्रभारी शिवसेना शहर प्रमुख यांच्या आडमुठेपणामुळे झाला असून त्याची किंमत मात्र महाविकास आघाडीला मोजावी लागली आहे. एका व्यक्तीच्या आडमुठेपणामुळे शिवद्रोही श्रीपाद छिंदमला उमेदवारी देणाऱ्या जातीयवादी भाजपाचा उमेदवार पुनश्च निवडून आला याचा काँग्रेस पक्षाला खेद आहे. स्व.अनिलभैय्या यांच्या विचाराप्रमाणे प्र.शिवसेना प्रमुख चालले असते तर ही वेळ महाविकास आघाडीवर आली नसती, असा आरोप शहर जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष अनंतराव गारदे यांनी केला आहे.
निवडणूक प्रक्रियेपासून अलिप्त असलेल्या काँग्रेसने आज निकालानंतर आपले मौन सोडले आहे. अनंतराव गारदे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, मुळात हा प्रभागच काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. या प्रभागात काँग्रेसचे दोन विद्यमान नगरसेवक आहेत. या प्रभागातील मतदार ही काँग्रेसची ओरिजिनल व्होट बँक आहे. या प्रभागात काँग्रेसचाच उमेदवार द्यावा असा प्रस्ताव आम्ही शिवसेने समोर ठेवला होता. शिवसेनेची या ठिकाणी जागा सोडण्याची काँग्रेसकडे मागणी होती. यासाठी शिवसेना काँग्रेसच्या शहरातील तसेच राज्याच्या नेत्यांना सातत्याने गळ घालत होती. स्व. अनिलभैय्या राठोड यांच्या निधनानंतर होणारी ही शहरातली पहिलीच पोटनिवडणूक होती. यामुळे मनाचा मोठेपणा दाखवून राज्याचे महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात व शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी ही जागा शिवसेनेला सोडली होती असे काँग्रेसने म्हटले आहे.
मात्र काँग्रेसने मनाचा एवढा मोठेपणा दाखवून देखील प्र. शिवसेनाप्रमुखांनी काँग्रेसचा हात सोडत केवळ राष्ट्रवादीला बरोबर घेत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. एवढंच नाही तर प्रचार पत्रिक छापताना जाणीवपूर्वक काँग्रेस नेत्यांचा अवमान करण्यात आला. आमचे नेते ना. बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष आ.नानाभाऊ पटोले, शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांना डावलण्यात आले. त्यानंतर देखील काँग्रेसची प्रचारात उतरण्याची व आपली ताकद महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या मागे उभी करण्याची खुल्या दिलाने तयारी होती. मात्र पुन्हा एकदा प्र.शिवसेनाप्रमुखांनी स्व.अनिलभैय्या यांनी राष्ट्रवादीच्या ज्या आमदाराच्या दहशतीच्या प्रवृत्तीच्या विरोधात आयुष्यभर भूमिका जपली त्याला हरताळ फासत त्यांच्याच हस्ते प्रचाराचा नारळ फोडला. प्रचार शुभारंभाचे साधे निमंत्रण देखील प्र.शिवसेनाप्रमुखांनी काँग्रेसला दिले नव्हते. काँग्रेसला एकदा देखील प्रचारासाठीचा निरोप त्यांनी दिला नाही असा खळबळजनक खुलासा काँग्रेसने केला आहे.
महाविकास आघाडीचा धर्म म्हणून काँग्रेसला या प्रचारात सक्रियपणे काम करण्याची इच्छा होती. प्रभागासह शहरातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांची तशी तयारी होती. तसा आदेश काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांचा व शहर जिल्हाध्यक्षांचा पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना होता.
पण आपल्या वैयक्तिक आडमुठेपणामुळे काँग्रेसला निमंत्रण सुद्धा न देणाऱ्या शिवसेना प्र.शहर प्रमुखांच्या भूमिकेमुळे काँग्रेसने प्रचारात उतरायचे तरी कसे आणि आपली ताकत उमेदवाराच्या मागे उभी तरी कशी करायची ? असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे. जाणीवपूर्वक काँग्रेसला संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत डावलत जाणीवपूर्वक अलिप्त ठेवण्यात आलं. चुकीच्या लोकांच्या मार्गदर्शनामुळे काँग्रेसचा अवमान देखील करण्यात आला. स्व.अनिलभैय्या असते तर ही बाब कदापी घडली नसती असे काँग्रेसने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
यामुळे प्रभागातील व शहरातील काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजीची भावना होती. काँग्रेसचा मतदार असणाऱ्या या प्रभागातील मतदारांनी देखील काँग्रेसला डावल्यामुळे पाठ फिरवली. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असून कुणाच्या दावणीला बांधलेला पक्ष नाही. शहरातील दहशतीच्या प्रवृत्ती विरोधात शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा अविरत लढा सुरू असून शहराचा विकास हेच एकमेव काँग्रेसचे ध्येय आहे. कुणी वैयक्तिक स्वार्थापोटी कुणाच्या दावणीला बांधून घेतले असले तरी त्यामागे फरपटत जाण्याची भूमिका काँग्रेस कदापि घेऊ शकत नाही.
स्व.अनिलभैय्या राठोड यांच्या प्रेरणेतून शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरणभाऊ काळे हे सतत काम करत असतात. मात्र आज अनिलभैयांची नसल्याची खंत ही खऱ्या शिवसैनिकांना आणि आमच्या काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांना प्रकर्षाने जाणवत आहे. शिवसेना नेते विक्रमभैय्या राठोड व स्व.अनिलभैय्या यांच्या विचारांना मानणारे सच्चे शिवसैनिक, काँग्रेस कार्यकर्ते ही महाविकास आघाडीची ताकद आहे. प्र.शिवसेनाप्रमुखांनी काँग्रेसचा अवमान करत काँग्रेसला डावलून प्रचारात सहभागी होण्यापासून रोखल नसतं तर शतप्रतिशत उमेदवाराचा विजय झाला असता, जातीवादी भाजपाला रोखता आले असते असा दावा गारदे यांनी काँग्रेसच्या वतीने केला आहे.
रविवारी शहर जिल्हा काँग्रेसची बैठक :
शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरणभाऊ काळे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी शहरातील पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. यावेळी कार्यकर्त्यांच्या भावना देखील पक्ष ऐकणार असल्याचे ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज गुंदेचा यांनी म्हटले आहे.