Home जिल्हा टँकर घोटाळाप्रकरणी राळेगणसिद्धीत उपोषण गावातील भ्रष्टाचाराबाबत अण्णा हजारेंचे मौन- रामदास घावटे

टँकर घोटाळाप्रकरणी राळेगणसिद्धीत उपोषण गावातील भ्रष्टाचाराबाबत अण्णा हजारेंचे मौन- रामदास घावटे

पारनेर दि.५ एप्रिल

पारनेर तालुक्यातील राळेगण सिद्धी येथील जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या सहकाऱ्यांनी केलेला टँकर घोटाळा प्रशासनावर दबाव आणून दडपला जात असल्याचा आरोप करत , लोकजागृती सामाजिक संस्थेने राळेगण सिध्दीत प्राणांतिक उपोषण करण्याची घोषणा केली आहे . सोमवार अकरा एप्रिल पासून येथे उपोषण चालू करणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष रामदास घावटे यांनी दिली .

याबाबतचे पत्र त्यांनी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे , भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास व ग्रामपंचायत राळेगण सिद्धी यांना दिले . अहमदनगर जिल्ह्यात दोन वर्षापुर्वी टँकर घोटाळा झाला होता . तेव्हापासून लोकजागृती सामाजिक संस्था याबाबत प्रशासन व न्यायालयात लढा देत होती . त्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने घोटाळेबाज कंपनी विरोधात शासनाच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे . परंतु गुन्हा दाखल झाला असला तरी तो फार गंभीर स्वरूपाचा नाही , असे दाखवण्याचा प्रयत्न राळेगणसिद्धीतील प्रमुख घोटाळेबाजांनी चालवलेला आहे .

गुन्हा दाखल झालेल्या साई सहारा कंपनीचे संचालक हे अण्णा हजारे यांचे आजी – माजी सहकारी असल्यामुळे त्याचा गैरफायदा घेऊन ते प्रशासनावर दबाव आणून घोटाळा दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचा असा आरोप करण्यात आला आहे . त्यामुळे आता अण्णांनीच या घोटाळ्यांच्या सखोल चौकशीची मागणी शासनाकडे करावी , राळेगणला ग्रामसभा बोलवावी , घोटाळेबाज सहकाऱ्यांचे राजीनामे घ्यावेत ,

साई सहाराच्या संचालकांच्या मालमत्तांची चौकशी करावी , घोटाळेबाजांना अण्णांच्या जवळ जाण्यास प्रतिबंध घालावा , यातील आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी करावी अशा विविध मागण्या या पत्रात करण्यात आल्या आहेत . लोकजागृतीच्या या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे कार्यकर्त्यांनी पिंपळनेरला गेल्या आठवड्यात आत्मक्लेश आंदोलन केले होते , परंतु तरीही राळेगण सिद्धी परिवाराने याबाबत कोणतीही दखल घेतली नाही .

देशातील कोणत्याही भ्रष्टाचार वर राळेगणच्या ग्रामसभेत चर्चा होते , ठराव होतात ,निर्णय होतात तर मग त्यांच्याच गावातील भ्रष्टाचाराची चर्चा का होत नाही , असा सवाल करत लोकजागृती सामाजिक संस्थेने राळेगण-सिद्धी परिवारा विरोधात उपोषणाचे हत्यार उपसले आहे . देशभरात भ्रष्टाचाराचे धडे देणाऱ्या राळेगण सिद्धीतच न्याय मिळत नसल्यामुळे आमच्यावर उपोषण करण्याची दुदैवी वेळ येत आहे असे संस्थेचे सचिव बबन कवाद यांनी सांगितले .

न्याय न मिळाल्यास त्यासाठी लोकशाही मार्गाने उपोषणाचे हत्यार वापरा असे नेहमी सांगणाऱ्या अण्णा हजारेंच्या गावातच उपोषण होत असल्याने याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे .

आण्णांचा भेटीला नकार ….!
आज आम्ही लोकजागृती सामाजिक संस्थेचे पदाधिकारी राळेगण सिद्धीला जावून आण्णांना उपोषणाबाबत माहीती देणारे पत्र घेवून गेलो असता अण्णांनी भेटण्यास नकार दिला . त्यानंतर आम्ही उपोषणाचे पत्र कार्यालयात जमा केले आहे .
– रामदास घावटे

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version