आगामी पाथर्डी पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजळे – ढाकणे या पारंपारिक राजकीय विरोधकांच्या गाठीभेटी,जेवणावळीनंतर आता “चाय पे” चर्चाने जोर धरला आहे.नेत्यांनी शहरात लोकांच्या गाठीभेटी घेऊन कार्यकर्त्यांच्या थेट घरी जेवणाचा आस्वाद घेत तर कधी कधी चाय पे चर्चा करीत राजकीय वातावरण ढवळून काढले आहे.
मागील आठवड्यात आमदार मोनिका राजळे यांनी शहरातील व्यापारी राजेंद्र हारकुट यांच्या घरी भेट देत जेवण घेतले. त्या पाठोपाठ राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अँड. प्रताप ढाकणे यांनी कापड व्यवसायिक अभय गांधी यांच्या घरी जाऊन कार्यकर्त्यांसमवेत जेवणाचा आस्वाद घेत जुन्या गप्पा गोष्टींना उजाळा दिला.भाजपच्या आमदार मोनिका राजळे, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अँड प्रताप ढाकणे या दोन्ही नेत्यावर पाथर्डी पालिका निवडणुकीसाठी त्यांच्या पक्षाच्या प्रमुखांनी त्यांच्यावर जबाबदारी दिली आहे.
त्यामुळे राजळे- ढाकणे ह्या पारंपरिक विरोधकांकडे पालिका निवडणुकीत मदार आहे. कधी क्रिकेट स्पर्धेच्या सामन्यातून तर कधी कार्यकर्त्यांच्या थेट घरी जाऊन जेवणाच्या माध्यमातून आता “चाय पे “चर्चातून राजळे – ढाकणे यांच्याकडून भेटी गाठीचा फंडा वापरला जात आहे.त्यापलीकडे जाऊन आमदार राजळे, अँड ढाकणे हे शहरातील प्रमुख चौकातील चहाच्या हॉटेवर चहा घेत कार्यकर्त्यांशी चायपे चर्चा जोरात सुरु आहे. पालिकेच्या निवडणुकीसाठी अधिक अधिक संवाद साधून संपर्क वाढवण्यासाठी नेते मंडळीं अश्या कार्यक्रमांना प्राधान्य देत आहे. पालिका निवडणुकीचा कार्यक्रम जरी जाहीर झाला नसला तरी दोन्ही नेत्यांच्या शहरातील लोकांच्या संपर्कातून थंडीच्या वातावरणात पालिकेचा गरमा गरम वारे वाहू लागले आहे.पालिका निवडणूक मार्च २०२२ या वर्षांमध्ये होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पालिकेतील पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ हा २७ डिसेंबर रोजी संपुष्टात आला आहे.त्यामूळे पालिका निवडणुकीची उत्सुकता सर्वांनाच आहे. पालिकेची सत्ता पुन्हा मिळवण्यासाठी भाजपाच्या आमदार मोनिका राजळे आगामी निवडणुकीची व्यूहरचना आखत आहे. तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अँड प्रताप ढाकणे हे पालिकेची सत्ता खेचून आण्यासाठी संपर्क वाढवला आहे.