पुणे – दि १३ मार्च
पाच कोटींची हवाला रक्कम घेऊन जाणाऱ्या व्यावसायिकाला 45 लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी ठाणे पोलिसांनी पुण्यातील तीन पोलिसांना अटक केली आहे. या व्यावसायिकाने १० मार्च रोजी नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
गणेश बाळासाहेब शिंदे, गणेश मारुती कांबळे , दिलीप मारुती पिलाने अशी ताब्यात घेण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत, ते सर्व पुणे शहरातील दत्तवाडी पोलीस ठाण्यात संलग्न आहेत. या प्रकरणात हवाला एजंट बाबूभाई राजाराम सोळंकी (४७, रा. पुण्यातील बालाजी नगर) यालाही अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार या प्रकरणातील फिर्यादी व्यापारी हा नाशिकहून मुंबईला ५ कोटी रुपयांची हवाला रोकड घेऊन जात होता. बाबूभाई सोलंकी हा तक्रारदाराच्या कुटुंबातील सदस्य असून तो हवाला एजंट म्हणून काम करतो. पाच कोटी रक्कम तो हवाला व्यवसायिक घेऊन जाणार असल्याची माहिती त्याने दत्तवाडी पोलिस ठाण्यातील तीन पोलिसांना दिली होती.
त्यावरून तीन पोलिसांनी ७ मार्चच्या रात्री पुणे सोडले आणि 8 मार्चच्या पहाटे भिवंडीला पोहोचले. त्यानंतर त्यांनी तक्रारदाराची चारचाकी भिवंडीतील मुंबई-नाशिक महामार्गावरील पेट्रोल पंपाजवळ अडवली. त्यांनी फिर्यादीला रोख दाखवण्यास सांगितले आणि नंतर व्यावसायिकाला जाण्यास परवानगी देण्यापूर्वी कथितरित्या ४५ लाख रुपये घेतले अशी माहिती तक्रारदाराने पोलिसांना दिली होती.
या प्रकरणात बाबुभाई सोळंकी याला अटक केल्यानंतर यात तीन पोलिसांचा सहभाग आढळून आल्याचा संशय पोलिसांना आल्याने नारपोली पोलिसांनी दत्तवाडीच्या तीन पोलिसांना ताब्यात घेतले आहे.