Home क्राईम अनैतिक व्यापार प्रकरणी बनपिंप्री येथील हॉटेल सुप्रिम बंद करण्याचे प्रशासनाचे आदेश

अनैतिक व्यापार प्रकरणी बनपिंप्री येथील हॉटेल सुप्रिम बंद करण्याचे प्रशासनाचे आदेश

4
Oplus_0

अहिल्यानगर, दि. २१ :- श्रीगोंदा तालुक्यातील बनपिंप्री येथील हॉटेल सुप्रिममध्ये अनैतिक व्यापार चालविला जात असल्याचे पोलीस अहवालातून निदर्शनास आल्याने अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम, १९५६ च्या कलम १८ अंतर्गत संबंधित आस्थापना बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भारतीय न्याय संहिता तसेच अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियमांतर्गत दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने श्रीगोंदा-पारनेर उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी हा आदेश पारित केला आहे.

श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी या कारवाईबाबतचा प्रस्ताव प्रशासनाकडे सादर केला होता. अहिल्यानगर–सोलापूर मार्गावरील बनपिंप्री येथील हॉटेल सुप्रिममध्ये आसाम, गुजरात व महाराष्ट्रातील सात महिलांना पैशाचे आमिष दाखवून आणण्यात आले होते. त्यांना हॉटेलमध्ये ठेवून पुरुष ग्राहकांकडून पैसे घेऊन त्यांच्यामार्फत देहव्यापार करण्यात येत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी हॉटेल चालक व मालक किरण रावसाहेब जरे आणि सुनील नाना पठारे यांच्याविरुद्ध श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता कलम १४३ तसेच अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम, १९५६ मधील कलम ३, ४, ५ व ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित आस्थापनेवर कारवाईचा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर संबंधितांना त्यांचे म्हणणे मांडण्याची पुरेशी संधी देण्यात आली होती. जागा भाडेकराराने दिली असून तेथे अनैतिक व्यापारास परवानगी दिलेली नसल्याचा तसेच आजारपणामुळे बाहेरगावी असल्याने या प्रकाराची माहिती नसल्याचा दावा हॉटेल मालकाने केला होता. सध्या हॉटेलमध्ये केवळ शाकाहारी भोजनाची सुविधा असून कारवाई झाल्यास कुटुंबाच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होईल, असेही त्यांनी नमूद केले. तसेच, हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने केवळ गुन्हा दाखल झाल्याच्या आधारावर कारवाई करू नये, असा युक्तिवादही करण्यात आला होता.

मात्र, पोलीस विभागाने सादर केलेल्या अहवालानुसार संबंधित जागेचा वापर अनैतिक व्यापारासाठी होत असल्याचे स्पष्ट झाल्याने सार्वजनिक हित व कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कारवाई करणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार संबंधित आस्थापना बंद करण्याचे आदेश देण्यात आले असून आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करून अनुपालन अहवाल सादर करण्याच्या सूचना श्रीगोंदा पोलीस निरीक्षकांना देण्यात आल्या आहेत.

तसेच, भविष्यात या जागेचा पुन्हा अनैतिक व्यापार अथवा कुंटणखान्यासाठी वापर झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित मूळ जमीन अथवा घरमालकाची राहील, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

*****

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here