अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील नगर-मनमाड रोडवरील एका नामांकित हॉस्पिटलवर शेजारील प्लॉटमध्ये बेकायदेशीर अतिक्रमण केल्याचा आरोप करण्यात आला असून, या प्रकरणी जागा मालक श्रीचंद कन्हैयालाल कृष्णानी यांनी अहिल्यानगर महानगरपालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे त्यांनी महापालिका आयुक्तांकडे रीतसर तक्रार दाखल करून न्यायाची मागणी केली आहे.
श्रीचंद कृष्णानी यांच्या म्हणण्यानुसार, सावेडी येथील सर्व्हे क्रमांक २६६ मधील प्लॉट क्रमांक ३ हा त्यांच्या मालकीचा असून त्या जागेवर सध्या कोणतेही बांधकाम करण्यात आलेले नाही. मात्र शेजारील प्लॉटवर उभारण्यात आलेल्या इमारतीमध्ये सुरू असलेल्या एका हॉस्पिटलने बांधकाम करताना त्यांच्या प्लॉटमध्ये अतिक्रमण करून कंपाउंड वॉल उभारली आहे. तसेच वीजपुरवठ्यासाठी मोठी डीपी (डिस्ट्रिब्युशन ट्रान्सफॉर्मर) देखील त्यांच्या मालकीच्या जागेत बसविण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
या प्रकरणी महानगरपालिकेकडे अनेक वेळा लेखी तक्रारी करण्यात आल्या. मात्र अतिक्रमण विभागाकडून कोणतीही प्रभावी कारवाई करण्यात आली नसल्याचे कृष्णानी यांनी सांगितले. सध्या या प्रकरणाची सुनावणी महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांसमोर सुरू आहे.
कृष्णानी यांनी दावा केला आहे की, संबंधित जागेची सर्व कायदेशीर कागदपत्रे, सरकारी मोजणीचा नकाशा तसेच महानगरपालिकेकडून प्राप्त झालेली माहिती त्यांच्या बाजूने आहे. असे असतानाही शेजारील प्लॉटधारक अतिक्रमण हटविण्याऐवजी अरेरावीची भूमिका घेत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
दरम्यान, त्यांच्या प्लॉटमध्ये बसविण्यात आलेली वीज वितरणाची डीपी तातडीने अन्यत्र हलविण्यात यावी, यासाठी त्यांनी महावितरणच्या सावेडी विभागाचे सहाय्यक अभियंता यांनाही लेखी निवेदन देऊन आवश्यक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
या संपूर्ण प्रकरणात महानगरपालिका व महावितरण प्रशासनाने वस्तुस्थितीची पडताळणी करून अतिक्रमण हटवावे आणि न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी श्रीचंद कृष्णानी यांनी केली आहे.





