📰 खबर अहिल्यानगरची
अहिल्यानगर | प्रतिनिधी
आगामी श्री गणेशोत्सव व नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यात डॉल्बी साऊंड सिस्टीम तसेच उच्च आवाजाच्या ध्वनीवर्धकांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) २०२३ च्या कलम १६३ (१) अंतर्गत अपर जिल्हादंडाधिकारी दादासाहेब गिते यांनी हा प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.

जिल्ह्यात १४ सप्टेंबर २०२६ रोजी श्री गणेश स्थापना, २५ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन, ११ ऑक्टोबर रोजी घटस्थापना आणि २० ऑक्टोबर रोजी दसरा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरे होणार आहेत. या कालावधीत मिरवणुकांमध्ये डॉल्बी सिस्टीमचा वापर करून मोठ्या आवाजात ध्वनीप्रदूषण केल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.
वृद्ध नागरिक, रुग्ण, गर्भवती महिला आणि लहान मुलांना डॉल्बीच्या प्रचंड आवाजाचा त्रास होत असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच ध्वनीप्रदूषणामुळे सार्वजनिक शांतता भंग होण्याचा, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचा आणि नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याचा संभव असल्याने प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
पोलीस अधीक्षक कार्यालयाने जिल्हा प्रशासनाला सादर केलेल्या अहवालात नमूद केल्याप्रमाणे, विविध सण-उत्सवांमध्ये वारंवार सूचना व समुपदेशन करूनही काही डॉल्बी चालक व मालक नियमांचे उल्लंघन करत असल्याचे आढळून आले आहे. याच पार्श्वभूमीवर हा आदेश जारी करण्यात आला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या जनहित याचिका क्र. १५२/२०१० मधील निर्देश तसेच ध्वनी प्रदूषण (नियंत्रण व नियमन) नियम २००० आणि पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ मधील तरतुदींचा आधार घेत हा निर्णय घेण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
📌 आदेशातील प्रमुख मुद्दे
१४ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर २०२६ : गणेशोत्सव कालावधी
११ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर २०२६ : नवरात्रोत्सव व दसरा कालावधी
मिरवणुकांमध्ये डॉल्बी साऊंड सिस्टीम वापरण्यास बंदी
डॉल्बी उपकरणे भाड्याने देणे किंवा उपलब्ध करून देण्यासही मनाई
आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता कलम २२३ अन्वये कारवाई
जिल्हा प्रशासनाने सर्व गणेश मंडळे, नवरात्रोत्सव मंडळे, डॉल्बी चालक व मालक तसेच नागरिकांना आदेशाचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.





