अहिल्यानगर
अहिल्यानगर महानगर पालिकेचा नगर रचना विभाग नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असतो सर्वात हॉट विभाग म्हणून नगररचना विभाग मानला जातो. या विभागात सर्व सामान्यांन पासून मोठ मोठे बांधकाम व्यावसायिकांचा राबता रोजच असतो.मात्र हा विभाग नेहमीच वादात राहतो. अनधिकृत बांधकामे, बोगस परवानग्या, आणि ढिसाळ कारभाराबाबत नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून वेळोवेळी गंभीर आरोप केले गेले आहेत. महापालिकेच्या नगर रचना विभागातील कारभारात पारदर्शकता नसल्याची तक्रार सातत्याने समोर येत असते. ओढे नाले बुजवून त्या ठिकाणी मोठ मोठ्या इमारती उभारल्या गेल्या या बाबत सध्या जिल्हाधिकारी यांच्याकडे सुनावणी सुरू आहे सामाजिक कार्यकर्ते शशिकांत चेंगडे हे या बाबत लढा देत आहेत.

महानगरपालिकेच्या अनेक नगरसेवकांनी अनेक वेळा नगररचना विभागाबाबत वेळोवेळी तक्रारी करून तेथील कारभाराचा नमुना समोर आणला आहे मात्र एवढे होऊनही या ठिकाणी काही कर्मचारी सुधारण्यास तयार नाहीत
हे सर्व होत असताना याबाबत काही कर्मचारी आपला कामाचा अनुभव रोजच येणाऱ्या नागरिकांना देत असतात. या ठिकाणी साधा आदेश टाईप करून त्यावर अधिकाऱ्यांची सही घेण्यासाठी दहा ते पंधरा हजार रुपयांचे फाळके मारावे लागते तरच संगणकावर बोटे फिरतात असा अनुभवही काही नागरिकांना आला तर फाळके मारूनही लवकर काम होत नाही असा अनुभव नागरिकांनी बोलून दाखवला आहे.

याबाबत नगररचना विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि महानगरपालिकेच्या आयुक्तांनी गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. आयुक्तांचे काम चांगले असले तरी काही निवडक कर्मचाऱ्यांमुळे महानगरपालिका आणि नगररचना विभागाची बदनामी होत आहे. त्यामुळे या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे असून नागरिकांना सुख सुविधा देणे यासाठी प्रथम कर्तव्य मानून इमानदार कर्मचाऱ्यांना नगररचना विभागात पाठवणे गरजेचे आहे.



