अहिल्यानगर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आणि त्यांच्या सार्वजनिक जीवनातील २५ वर्षांच्या यशस्वी वाटचालीचे औचित्य साधून, अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने ‘सेवा संकल्प अभियान’ व ‘स्वच्छता हीच सेवा’ या उपक्रमाचा शुभारंभ रेसिडेन्शिअल हायस्कूल येथे येथे करण्यात आला. १५०० विद्यार्थ्यांनी काढलेल्या दोन किलोमीटर लांबीच्या भव्य स्वच्छता रॅलीने या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. ढोल-ताशांचा निनाद, विद्यार्थ्यांच्या घोषणा आणि हातातील फलक या माध्यमातून शहरात स्वच्छतेच्या संकल्पाबाबत जनजागृती करण्यात आली. ‘स्वच्छता ही केवळ मोहीम नाही, तर ती आपल्या दैनंदिन जीवनातील संस्कार आणि जबाबदारी आहे,’ स्वच्छ शहराच्या निर्मितीसाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन महापौर ज्योती गाडे यांनी केले. तर, स्वच्छतेची सुरुवात स्वतःपासून व्हायला हवी, असे सांगत या अभियानात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयुक्त यशवंत डांगे यांनी केले.

संपूर्ण महाराष्ट्रात हे ‘सेवा संकल्प अभियान’ १७ सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विविध उपक्रमांसह राबविले जाणार आहे. अहिल्यानगर शहरात महानगरपालिकेच्या वतीने या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी अहिल्यानगरच्या महापौर ज्योतीताई गाडे, महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती दिपालीताई बारस्कर, उपसभापती वर्षा सानप, नगरसेवक महेश लोंढे स्वच्छतादूत डॉ. अमोल बागुल, मुख्य लेखा परीक्षक गणेश लयचेट्टी, रेसिडेन्शिअल हायस्कूलचे प्राचार्य श्री. जाधव आणि पर्यावरणदूत सुरेश खामकर, श्री. पालीवाल आदी उपस्थित होते. या रॅलीमध्ये राष्ट्रीय हरित सेना, इको क्लब, मिशन लाइफ, एनसीसी, समाजसेवा तसेच स्काऊट-गाईडचे विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्य जाधव यांनी प्रास्ताविकातून ‘सेवा संकल्प अभियान’ आणि स्वच्छता पंधरवड्यांतर्गत राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली.
महापौर ज्योतीताई गाडे यांनीही स्वच्छ शहराच्या निर्मितीसाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे अधोरेखित केले. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छतेचे महत्त्व पटवून देताना त्यांनी विद्यार्थ्यांना लहान वयापासूनच दैनंदिन स्वच्छतेच्या सवयी अंगीकारण्याचे आणि या मोहिमेतून ‘स्वच्छतेची संस्कृती’ निर्माण करण्याचा निर्धार करण्याचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत सर्व विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे ‘शंभर दिवसांच्या स्वच्छता संकल्पाची’ शपथ घेतली आणि स्वच्छ परिसर, स्वच्छ शाळा व स्वच्छ शहरासाठी स्वतःपासून सुरुवात करण्याचा दृढ निर्धार व्यक्त केला.
आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले की, स्वच्छता ही प्रत्येकाच्या जीवनातील महत्त्वाची संस्कारमूल्ये असल्याचे स्पष्ट केले. घर, शाळा तसेच सार्वजनिक परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन करत ‘स्वच्छतेची सुरुवात स्वतःपासून झाली पाहिजे’ हा संदेश त्यांनी दिला. स्वच्छता ही सेवा अभियानात महानगरपालिकेमार्फत राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची सविस्तर माहिती त्यांनी यावेळी दिली.
स्वच्छता ही सेवा अभियानात १७ सप्टेंबर रोजी अभियानास शुभारंभ होऊन स्वच्छता अभियान, स्वच्छता शपथ आणि जनजागृती रॅली काढण्यात आली. १७ ते १८ सप्टेंबर दरम्यान स्वच्छता ज्ञान यात्रा व स्वच्छ पाठशाला उपक्रमांतर्गत शाळांमध्ये चार प्रकारच्या कचरा वर्गीकरणाबाबत मार्गदर्शन, तसेच विद्यार्थी व युवकांच्या कंपोस्ट प्लांट, एमआरएफ, आरआरआर सेंटर व एसडब्लूएम सुविधांना अभ्यासभेटी आयोजित केल्या जातील. १९ सप्टेंबरला प्रभागनिहाय घाण साचणारी ठिकाणे ओळखणे, नकाशांकन व जिओ-टॅगिंग करणे, २० सप्टेंबर रोजी विशेष स्वच्छता, कचरा व डेब्रिज हटविणे, सौदर्यीकरण व कामांचे ‘आधी-नंतर’ छायाचित्रण, २१ सप्टेंबरला सार्वजनिक ठिकाणे जसे बसस्थानक, रेल्वे परिसर, बाजारपेठा, उद्याने व गर्दीच्या ठिकाणी विशेष स्वच्छता मोहीम, २२ सप्टेंबरला बाजारपेठ स्वच्छतेअंतर्गत व्यापारी व नागरिकांमध्ये कचरा वर्गीकरण, प्लास्टिकमुक्त बाजार व कचरा न टाकण्याबाबत जनजागृती, २३ सप्टेंबर रोजी जनसहभाग जनजागृती अंतर्गत घराघरात जनजागृती, घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६, चार प्रकारचे वर्गीकरण व घरगुती कंपोस्टिंग याबाबत माहिती देणे, २५ सप्टेंबरला स्वच्छ पर्व – गणेशोत्सव स्वच्छतेत निर्माल्य संकलन, पर्यावरणपूरक उत्सव, प्लास्टिकमुक्त गणेशोत्सव व विसर्जनस्थळ स्वच्छता मोहीम, २६ सप्टेंबर रोजी ‘स्पोर्ट्स फॉर स्वच्छता’ अंतर्गत स्वच्छता विषयक क्रीडा स्पर्धा, स्वच्छता रन व कार्यक्रमानंतर स्वच्छता, २७ सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिनानिमित्त ऐतिहासिक, धार्मिक व पर्यटनस्थळांची स्वच्छता मोहीम, २८ ते २९ सप्टेंबर दरम्यान ‘कबाड से जुगाड’ या उपक्रमात टाकाऊ वस्तूंपासून उपयोगी वस्तू तयार करण्याच्या स्पर्धा, ३० सप्टेंबरला सफाईमित्र सुरक्षा व सन्मान शिबिरांतर्गत कर्मचाऱ्यांच्या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन, सुरक्षा प्रशिक्षण, कल्याणकारी योजनांची माहिती व सत्कार, १ ऑक्टोबर रोजी ‘एक दिवस, एक तास, एकत्र’ या उपक्रमात सामूहिक श्रमदान, कचरा साचणाऱ्या ठिकाणी स्वच्छता नागरिक सहभागातून होणार, २ ऑक्टोबरला स्वच्छ भारत दिवसानिमित्त स्वच्छता शपथ, उत्कृष्ट कामगिरीचा गौरव व वृक्षारोपण उपक्रमांचे आयोजन आदी कार्यक्रम व उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले.





