खबर अहिल्यानगरची
अहिल्यानगर | प्रतिनिधी
विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) प्रक्रियेच्या विरोधात काँग्रेस आणि विरोधी पक्षांकडून देशभर सुरू असलेले आंदोलन हे जनतेची दिशाभूल करणारे असून मतदार यादी शुद्धीकरण प्रक्रियेला बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप भाजपचे उपमहापौर धनंजय जाधव यांनी केला. अहिल्यानगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नगर विधानसभा एसआयआर प्रमुख बाबासाहेब सानप उपस्थित होते.
यावेळी बोलताना जाधव म्हणाले की, मतदार यादीतील दुबार नावे, स्थलांतरित मतदार तसेच अपात्र नोंदी दूर करण्यासाठी ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. एका मतदाराला एकाच ठिकाणी मतदानाचा अधिकार असून अनेक ठिकाणी नागरिकांची नावे दोन-दोन मतदारसंघांत असल्याची उदाहरणे आढळून आली आहेत. त्यामुळे मतदार यादी अधिक अचूक व पारदर्शक करण्यासाठी ही मोहीम आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
काँग्रेस व विरोधी पक्षांकडून फेक नॅरेटिव्ह तयार करून देशातील वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत जाधव म्हणाले की, निवडणुकांमध्ये अपयश आल्यामुळे लोकशाही प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. मतदार यादी शुद्धीकरणाच्या प्रक्रियेला विरोध करण्याऐवजी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी एसआयआर प्रमुख बाबासाहेब सानप यांनी सांगितले की, संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असलेल्या या मोहिमेत विविध राजकीय पक्षांच्या बीएलए-१ व बीएलए-२ प्रतिनिधींनी सहभाग घेतला आहे. नगर शहरात काँग्रेसच्या प्रतिनिधींनी सर्वाधिक हरकती आणि सूचना नोंदवल्या असून त्यांच्याच स्वाक्षऱ्या संबंधित कागदपत्रांवर आहेत. असे असताना आता त्याच प्रक्रियेविरोधात आंदोलन करून जनतेमध्ये संभ्रम निर्माण केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
मतदार यादी शुद्धीकरण प्रक्रियेत कोणत्याही पात्र मतदाराचे नाव अन्यायकारकपणे वगळण्यात आले असल्याचे ठोस उदाहरण विरोधकांनी सादर करावे, असे आव्हान सानप यांनी दिले. प्रशासनाने अत्यंत पारदर्शकपणे काम केले असून बीएलओंनी घराघरांत जाऊन पडताळणी केल्याचेही त्यांनी नमूद केले.
संविधान आणि घटनात्मक संस्थांवर अविश्वास निर्माण करण्याचे काम काँग्रेस आणि महाविकास आघाडी करत असल्याचा आरोप करत सानप यांनी मतदार यादी शुद्धीकरण ही लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठीची प्रक्रिया असल्याचे सांगितले. जनतेने यापूर्वी काँग्रेसला नाकारले असून आगामी काळातही अशा फेक नॅरेटिव्हला बळी पडणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.





