अहिल्यानगर प्रतिनिधी :
अहिल्यानगर शहरातील साईदीप हॉस्पिटल परिसरात अनधिकृत अतिक्रमण आणि बेशिस्त वाहन पार्किंगमुळे वाहतूक कोंडीची गंभीर समस्या निर्माण झाली असून परिसरातील नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

रुग्णालयात येणाऱ्या वाहनांची वाढती संख्या, रस्त्यांवरील अतिक्रमणे आणि रस्त्यावरच अनधिकृतपणे पार्क होणाऱ्या वाहनांमुळे परिसरातील रस्ते कायमस्वरूपी जाम राहत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, सकाळ आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत परिस्थिती अधिकच बिकट होते. रस्त्यांची रुंदी कमी झाल्याने वाहतुकीचा वेग मंदावतो आणि अनेकदा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णवाहिकांनाही मार्ग काढणे कठीण होते. काही प्रसंगी रस्त्यावर बेशिस्तपणे उभ्या असलेल्या वाहनांमुळे रुग्णवाहिका अडकून पडत असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे आपत्कालीन वैद्यकीय सेवांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
वाहतूक कोंडीमुळे स्थानिक नागरिकांचा मौल्यवान वेळ वाया जात असून मानसिक तसेच शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात, अशी मागणी महापालिकेकडे निवेदन देऊन परिसरातील रहिवाशांनी केली आहे.

नागरिकांनी प्रशासनाकडे परिसरातील अनधिकृत हातगाड्या, टपऱ्या आणि अतिक्रमणे हटविण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याची मागणी केली आहे. तसेच रुग्णालयाच्या आसपास आणि कॉलनीतील रस्त्यांवर बेकायदेशीर पार्किंग करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करावी, अशीही अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, साईदीप रुग्णालयासमोरील रस्ता हा ‘नो पार्किंग झोन’ म्हणून घोषित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे या परिसरात रस्त्यावर वाहने उभी करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांनी आणि नागरिकांनी आपली वाहने साईदीप रुग्णालयाच्या अधिकृत वाहनतळातच पार्क करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.



