अहमदनगर दि.१६ डिसेंबर ( सुशील थोरात )
अहमदनगर शहरात गेल्या काही महिन्यांपासून एक वेगळेच वातावरण धुसफूसतय अगदी छोट्या छोट्या वादावादीला जातीय स्वरूप दिलं जातंय. नेमकं हे कोणाला हवंय आणि कशासाठी हवंय. कारण शहरात अशांतता पसरवुन तरुणांची डोके भडकऊन काही तरी चुकीचं कृत्य त्यांच्या हातून घडवुन घेण्याचा डाव कोणाच्यातरी डोक्यात आहे. मात्र हा डाव साध्य होताना दिसत नाही. त्यामुळे शहरात छोट्या-मोठ्या गोष्टींवरून जातीय तणाव निर्माण होत असल्यामुळे याचा सर्वात मोठा ताण पडतोय तो पोलिसांवर वरिष्ठांना याची कल्पनाही नसेल मात्र स्थानिक पातळीवर जे पोलीस काम करतात त्यांना याचा प्रत्यय नक्कीच रोज येत असेल.
सोशल मीडियावर म्हणजेच व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि फेसबुक या ठिकाणी एखादी कमेंट एखाद्या समाजाविरुद्ध पडली की त्याच्या विरोधात दुसरी कमेंट पडलीच म्हणून समजा आणि या कमेंट चे रूपांतर मग पुढे जातीय तणावात कधी होते हे समजतही नाही आणि याचा सर्वात जास्त ताण पडतो तो पोलीस प्रशासनावर दोन्ही समाजातील गट तट आणि कार्यकर्त्यांना समजून सांगण्यात आणि काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून त्यांना डोळ्यात तेल घालून आणि सर्वांच्या सोयीने घेऊन शहरात शांतता टिकवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात पोलिसांना सध्या दुधारी तलवारीवरून चालावे लागत असल्याचा प्रत्येय पावलोपावली येत आहे.
मात्र आता पोलिसांनी ही थोडी खमकी भूमिका घेणे गरजेचे आहे.कारण शुल्लक घटना घडली तरीही पोलीस स्टेशनमध्ये शेकडो लोकांची गर्दी होणे हे फॅड होत चाललं आहे. त्यामुळे पोलिसांवरही मोठा ताण वाढतो आणि शहरात वेगळाच संदेश पोहोचतो त्यामुळे आता ही गर्दी कमी करायची असेल तर पोलिसांनी आता कडक पाऊले उचलणे गरजेचे आहे. वाद हा फक्त दोघा जणांचा असतो मात्र शेकडो लोकांचं पोलीस स्टेशनवर येणे म्हणजे एक प्रकारे दबाव टाकण्यासारखंच आहे. हा प्रकार आता शहरात वाढत चालला असून वरिष्ठांनी यावर काहीतरी कठोर कारवाई करून अशा पोलीस स्टेशनवर येणाऱ्या घोळक्याविरूद्ध कारवाई करणे गरजेचे आहे.
तथाकथित सामाजिक कार्यकर्ते हे सुद्धा अशा घटनेत पुढे येऊन याच्यावर कारवाई करू नका त्याच्यावर कारवाई करा असा दबाव पोलिसांवर टाकत असतात त्यामुळे सहाजिकच एखाद्यावर कारवाई झाली नाही तर पोलिसांना समोरच्याच्या रोशाला बळी पडावे लागते. मात्र अनेक वेळा राजकारण मध्ये येत असल्याने गुन्हे दाखल होताना पोलिसांवर मोठा दबाव असतो हेही तेवढेच सत्य आहे.
आज-काल एक गोष्ट विशेष झाली आहे एखादी घटना घडली की त्याची माहिती वाऱ्यासारखी पसरते आणि शेकडो लोक काही वेळातच जमा होतात आणि त्यातून काहीतरी अनुचित प्रकार घडेल म्हणून पोलिसांना घटनास्थळी जावे लागते.
एखादी दंगल घडते म्हणजे काय या दंगलीला कारणीभूत फक्त एखादा दगडत असतो तो दगड पडला की मग तो कोणाचे डोकं फोडतो हे समजत नाही. मात्र तिथून पुढे बेधुंदपणे होऊन ही दगडफेक सुरू होते आणि अनेकांचे डोके फुटले जातात जाळपोळ होते आणि याच्यात होरपळत जातो तो यामध्ये कधी न येणारा तरुण त्याच्या डोक्यातही नसते की भविष्यात एवढी मोठी घटना होऊ शकते मात्र त्या गर्दीच्या वनव्यात तो अडकला जातो आणि त्याचं भविष्य त्याच ठिकाणी अंधारात जाते. दंगल होणे म्हणजे फक्त दोन गटात भांडण होणे हे नव्हे तर अनेकांचे घर संसार उध्वस्त होतात अनेक तरुणांना भविष्यातील अनेक अडचणींना सामोरे जावे लागते कोर्ट कचेरी, पोलीस स्टेशन यामध्ये तरुण पुरता अडकला जातो यावेळेस मात्र कोणीही मदतीला येत नाही हेही तेवढेच सत्य आहे.त्यामुळे तरुणांनी वेळेत सावध होणे हे गरजेचे आहे.
फकीर की बस्ती म्हणून नगर शहराची ओळख आहे या नगर शहरात अनेक जण आले आणि अनेक जण गेले मात्र एक गोष्ट निश्चितच आहे नगर शहर फार छोटे शहर आहे त्यामुळे या शहरात शांतता टिकवणे हे आपल्या नगरकरांच्या हातात आहे. कोणी कितीही बाहेरचा माणूस येऊन बोलून गेला तरी आपल्याला रोजच एकमेकांशी संबंध ठेवायचे आहेत रोजच एकमेकांची चेहरे पाहायचे आहेत मग ही कटूता कशाला ! छोट्या मोठ्या कारणांमुळे होत असलेली अशांतता पुढील काळात काहीतरी मोठी अनुचित घटना घडणार असल्याचे संदेश देत आहेत.ही अनुचित घटना घडली तर याचा तोटा फक्त येणाऱ्या पिढीलाच भोगावा लागणार आहे. कारण या सर्व घोळक्यांमध्ये सध्या फक्त तरुण पिढी दिसतीये मग तो कोणत्याही समाजाचा घोळका असतो त्यामध्ये फक्त तरुणच दिसतात या तरुणांना आता जरी समजत नसेल तरी भविष्यात यांचे भविष्य खराब होणार आहे. कारण पोलिसांची एखादी ही केस पडली तर पुढे आयुष्यभर कोर्टात चकरा मारणे आणि नोकरीसाठी संधी घालवणे हे त्यांना आता समजत नाही मात्र जे जाणकार लोक यामध्ये आहेत ते कोणत्याही समाजाचे असोत त्यांनी या गोष्टी या तरुणांना सांगणे गरजेचे आहे.
या तरुणांना चिथावणी जरूर द्या मात्र ती चिथावणी त्यांच्या येणाऱ्या पुढील काळात चांगले काम करण्याची असायला हवी त्यांना योग्य दिशा दाखवणारी हवी. जर आपण जातपात धर्म यामध्ये या तरुणांना अडकवले तर या तरुणांचे भविष्य अंधकारमय होईल हे तेवढेच निश्चित आहे. प्रत्येकाला जात धर्म याचा अभिमान असायलाच हवा मात्र तो अभिमान दाखवण्या पेक्षा प्रत्यक्ष कृतीत आणणे गरजेचे आहे. कोणत्याही जातीच्या अथवा धर्माच्या देवाने धर्मासाठी रक्षण करणाऱ्या मोठमोठ्या युगपुरुषांनी कधीही धर्म मध्ये न आणता फक्त जो अत्याचार करत आहे त्याच्या विरोधात लढाई लढल्या आहेत. कोणताही धर्म कोणताही देव दुसऱ्या जातीबद्दल द्वेष करण्यास सांगत नाही मात्र तो द्वेष सध्या पसरवला जातोय.
सध्याची तरुणाई ही सोशल मीडियाच्या आभासी जगात वावरत असून ही सोशल मीडिया म्हणजेच सत्य असल्यास भास या आभासी दुनियात वावरणाऱ्या तरुणांना होतोय आणि त्यामुळेच छोटा-मोठ्या स्टेटस मुळे तरुणांमध्ये वाद होऊ लागले आहेत आणि हे वाद पुढे मोठ्या भांडणाचा रूपांतर होऊ लागले आहेत.
नगर शहरात सध्या तणावपूर्ण शांतता असून ही शांतता वादळापूर्वीची शांतता आहे. मात्र पुढे या वादळाचे रूपांतर एखाद्या सुनामी मध्ये होऊ नये म्हणून पोलिसांनी आत्तापासूनच कठोर पावले उचलणे गरजेचे आहे. अन्यथा या तणावपूर्ण शांततेच वादळ आलं तर याचा फटका सर्वसामान्य जनतेला जास्त बसेल या वादळात आत्तापर्यंतच्या इतिहासानुसार फक्त आणि फक्त सर्वसामान्य रोडवरील जनताच बळी गेलेली आहे. कोणतीही दंगल झाली तरी याचा पहिला फटका बसतो तो सर्वसामान्य नागरिकांना मग तो रस्त्यावरील फळवाला असेल चहा टपरीवाला असेल, रिक्षावाला असेल माल वाहतूक गाडीवाला असेल या सर्वसामान्य जनतेला याच्या तीव्र झळा सोसाव्या लागतात. मात्र आजपर्यंतच्या इतिहासात वनवा पेटवून देणारा कधीही समोर आला नाही आणि त्याच्या घरातील एकाही व्यक्तीला या वनव्याचा चटका बसलेला नाही हे त्रिवार सत्य आहे. त्यामुळे आता तरुणांनी ही एक गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे धर्माचा अभिमान बाळगा मात्र धर्माचे राजकारण होऊ देऊ नका अन्यथा नगर शहरात अशांतता पसरायला एक ठिणगीही पुरेसी आहे…
✍️ सुशील थोरात