अहमदनगर दि .१५ जून–
अहमदनगर शहरात काही गुंडांकडून लोकांच्या जमिनीवर ताबे मारण्याचे प्रकार वाढत आहेत याबाबत आवाज महाराष्ट्राच्या माध्यमातून “ताबा” या सदराखाली जवळपास पंधरा भाग प्रकाशित करून ताबा माफीयांचे जाळे कशाप्रकारे काम करते याची मालिका लावली होती तत्कालीन पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सुद्धा या “ताबा” सदराची दखल घेतली होती मात्र आता या ताबा प्रकरणी शिक्का मोर्तब झाले असून आता राजकीय पक्षासह काही नागरिक याप्रकरणी पुढे येऊ लागले आहेत.
गुंड प्रवृत्तीच्या लोकांना हाताशी धरून नगर शहरात घरावर तसेच जमिनीवर ताबा मारण्याचा प्रकार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. हा प्रकार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सहन करणार नाही. नागरिकांनी असे प्रकार जर त्यांच्या बाबतीत घडले असतील तर उघडपणे सांगावेत, असे आवाहन युवा सेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड यांनी पत्रकारांशी बोलताना केले. या सर्व घटनांना स्थानिक लोकप्रतिनिधी जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी यावेळी करत या वाढत्या घटनांच्या निषेधार्थ 30 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा दिला.
कल्याण रोड परिसरातील कलवार कुटुंबाची जागा बळकावण्याचा प्रयत्न नुकताच उघडकीस आला आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत राठोड बोलत होते. यावेळी उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव, माजी महापौर भगवान फुलसौंदर, माजी महापौर अभिषेक कळमकर, नगरसेवक योगीराज गाडे, अशोक दहिफळे, बाळासाहेब बोराटे, दत्ता जाधव, अंबादास शिंदे आदी उपस्थित होते. विक्रम राठोड म्हणाले की, नगर शहरामध्ये मागील 40 वर्षांमध्ये कधीच अशा प्रकारची गुंडगिरी झालेली नव्हती. पण, आता अलीकडच्या सात ते आठ वर्षांमध्ये ताबा मारण्याची पद्धत मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. सर्वसामान्य लोकांना याचा मोठा फटका बसू लागलेला आहे.
खासदार डॉ. सुजय विखे पाटील काय करतात? अधिकारी वर्ग या सर्व गोष्टींना जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. जे व्यक्ती बाहेरगावी राहत आहेत, अशांची यादी गोळा करून हे त्या गुंडांना देत आहेत. त्यातूनच हे प्रकार घडत असल्याचेही त्यांनी सांगितले. अनिल राठोड हे आमदार असताना असे कधी घडलेले नव्हते. मात्र, आता हे प्रकार सर्रासपणे घडले आहेत. खासदार डॉ.सुजय विखे यांना लोकांनी निवडून दिले ते आता काय करतात?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या घटनांना लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत, असा आरोप त्यांनी केला. नगरसेवक योगीराज गाडे म्हणाले, या टोळ्या बनावट कागदपत्रे शासकीय कार्यालयातच तयार करतात. शासकीय अधिकारी-कर्मचारी याबाबत कुठलीही शहानिशा करत नाहीत. त्यामुळे असे प्रकार घडत असून, महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी तसेच महसूल मंत्र्यांनीही या गंभीर प्रश्नात लक्ष घालणे गरजेचे आहे.
या टोळ्यांचा एकजुटीने मुकाबला करण्याची वेळ – अभिषेक कळमकर यांनी घडलेली घटना अतिशय भयंकर असून जागा बळकावण्याचे प्रकार चालल्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न सुद्धा गंभीर होत चालला असल्याचे त्यांनी सांगितले. माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी राठोड हे नगर शहराचे प्रतिनिधित्व करत होते. त्यावेळी त्यांनी सर्वसामान्य नागरिकांसाठी संरक्षणाचा विषय घेतला होता. तेव्हा असे प्रकार कधीच घडले नव्हते. मात्र, आता सर्वसामान्यांची मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक करून एक प्रकारे टोळ्या यांनी नगरमध्ये सक्रिय झाल्या आहेत. त्यांचा मुकाबला करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी नागरिकांनी सुद्धा एक दिलाने पुढे आले पाहिजे, असे ते म्हणाले.
कल्याण रोडवर 16 गुंठे जागा बळकावण्याचा प्रयत्न – यावेळी कलवार यांनी सांगितले की, नगर-कल्याण रोडवर 16 गुंठे जागा वडिल रामेश्वर यांच्या नावावर होती. वडील मयत होऊन पाच वर्षे झालेले होते. आम्ही या ठिकाणी आलेलो नव्हतो. त्यामुळे या जागेच्या आम्हाला काही माहीत नव्हते. मात्र, ज्या वेळेला आम्ही आमची कागदपत्रे तपासायला गेलो त्यावेळी ही जागा परस्पररित्या गुंडांनी घेतली असल्याचे निदर्शनास आले. आम्ही या संदर्भात पोलिसांकडे गेलो पण पोलिसांनी सुद्धा थातूरमातूर कारवाई केली. आमची जागा मोहोळ नामक व्यक्तीला विकण्याचा प्रकार झाला. आम्ही या संदर्भामध्ये न्यायालयात गेलो असून न्यायालयाने या जागेवर कोणतेच व्यवहार करू नये, अशा प्रकारची स्टे ऑर्डर दिली आहे. गुंड प्रवृत्तीचे लोक आणून आमच्या कुटुंबाला धमकवण्याचा प्रकार झाला आहे, असे त्यांनी सांगितले.
सावेडी उपनगरातील महिलेचीही कैफियत – यावेळी शारदा लोंढे यांनी प्रोफेसर कॉलनीमध्ये आमची पाच एकर जागा असून या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारचे गुंड आमच्या ठिकाणी आणून जागा खाली करून घेण्याचा प्रयत्न यावेळी झाला. तसेच या ठिकाणी जोशी नामक व्यक्तीला या ठिकाणी आणून तेथे सुद्धा आमच्या जागेवर कब्जा करण्याचा प्रयत्न झाला. गेल्या दहा वर्षापासून आम्हाला अशा प्रकारचा त्रास सहन करावा लागत आहे असे ते म्हणाले. आम्ही या संदर्भात न्यायालयामध्ये गेलेलो आहोत. आमचे तिथे सुद्धा केस चालू आहे. पण दुसरीकडे अशा प्रकारची दहशत करून गुंड घरी पाठवून दमदाटी करण्याचा प्रकार घडत आहे, असे त्यांनी सांगितले.