अहिल्यानगर दिनांक ९ जून
महापालिका आरोग्य विभागाचा कारभार सुधारण्याऐवजी, आरोग्य अधिकाऱ्यांकडून स्वतःच्या सोयीसाठी नवीन दालन किंवा कार्यालयाची निर्मिती करून नूतनीकरण करण्यासाठी धावाधाव सुरू असल्याचे दिसून येते. मूलभूत सुविधा आणि स्वच्छतेकडे दुर्लक्ष करून, अधिकाऱ्यांचे कार्यालयीन आराखड्यांवर लक्ष केंद्रित असणे हेच या भोंगळ कारभाराचे मुख्य लक्षण आहे.जर आरोग्य विभागाच्या जन्म मृत्यू नोंदणी कार्यालयात रोज चक्कर मारली तर नागरिकांना कोणताही दाखला वेळेवर मिळत नाही त्यामुळे रोजच या ठिकाणी येणारे नागरिक मनस्ताप सहन करत असतात.

या प्रमुख गोष्टींकडे दुर्लक्ष करत आरोग्य अधिकारी नवीन दालन शिफ्टिंग कडे लक्ष देत आहेत.मात्र या बाबत महापालिका आयुक्त आणि इतर अधिकाऱ्यांना कोणतीच कल्पना नसल्याची माहिती मिळत आहे. याबाबत आयुक्त यांना फोनवर संपर्क केला असता त्यांचा फोन नॉट रिचेबल आहे. तर जुन्या महानगर पालिका कार्यालयातून आरोग्य विभाग स्थलांतरित होत असल्याचं कर्मचाऱ्यांनी सांगितलंय त्यामुळे हे स्थलांतर कोणाच्या आदेशाने होत आहे हा प्रश्न असून नागरिकांना मिळणाऱ्या आरोग्य सेवा, औषधोपचार आणि साथरोग नियंत्रण जनहिताच्या योजना राबवण्याऐवजी अधिकाऱ्यांचे स्वतःच्या दालनाचे नूतनीकरण आणि सोयी-सुविधांसाठी अवाजवी प्रयत्न करणे किती महत्वाचे आहे हे या नूतन दालन स्थलांतरावरून दिसून येत आहे.





