अहमदनगर दि.५ जून
अहमदनगर दक्षिण मतदार संघात महायुतीचा पराभव झाला असून भाजपच्या लोकसभेच्या बालेकिल्ल्यात महाविकास आघाडीने आपला झेंडा रोवला आहे. निलेश लंके हे या निवडणुकीत जॉईंट किलर म्हणून समोर आले आहेत. थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आल्यानंतरही महायुतीच्या उमेदवाराचा पराभव झाला असून यामुळे आता या पराभवाची काही कारणे समोर येऊ लागले आहेत.
भाजपमधीलच काही नेते आणि कार्यकर्ते नाराज होते या नाराजीचा फटका हा महायुतीच्या उमेदवाराला बसला आहे. चार जून रोजी मतमोजणी झाल्यानंतर भाजपचे माजी नगरसेवक प्रदीप भैय्या परदेशी हे रात्री उशिरा महाविकास आघाडीचे विजयी उमेदवार निलेश लंके यांना खांद्यावर बसून नाचत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि या नंतर भाजपमधील खदखद आता हळूहळू बाहेर येऊ लागली आहे. प्रदीप भैय्या परदेशी यांनी असं का केलं याबाबत भाजपच्या वरिष्ठांनी त्यांचे मनोगत जाणून घेणे गरजेचे आहे त्यानंतरच खरी माहिती उघड होऊ शकते.
निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावल्यामुळे अनेक भाजप कार्यकर्ते आतापर्यंत गप्प होते मात्र ही खदखद आता हळूहळू समोर येऊ लागली आहे याची सुरुवात भाजपचे माजी नगरसेवक प्रदीप भैय्या परदेशी यांच्या रूपाने सुरू झाली आहे. प्रदीप परदेशी हे सुरुवातीपासून शिवसेनेबरोबर होते अनेक वर्ष त्यांनी शिवसेनेत घालवल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपच्या तिकिटावर ते नगरसेवक म्हणूनही निवडून आले होते आणि त्यानंतर मात्र भाजपमध्ये त्यांचा वावर काहीसा कमीच झाला होता. लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर पासूनच भाजपच्या काही नेत्यांमध्ये चलबीचल सुरू होती मात्र वरिष्ठांच्या निर्णयामुळे सर्वांनी शांततेचे धोरण घेतले होते मात्र आता ही खदखद हळूहळू बाहेर येऊ लागली असून याबाबत भाजपचे वरिष्ठ गांभीर्याने लक्ष देणार का ? प्रदीप भैय्या परदेशी यांच्यासारख्या एकनिष्ठ नेत्यांना आणि एकनिष्ठ कार्यकर्त्यां समावेत चर्चा करून त्यांच्या मनातील खरी परिस्थिती जाणून घेणार का नाहीतर याचा फटका आगामी विधानसभेत भाजपला चांगलाच बसू शकतो.