अहमदनगर – दि.१९ फेब्रुवारी
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक उलथा पालथ होत असून काँग्रेसचे अनेक मातब्बर नेते भाजपच्या वाटेवर आहेत. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला त्यामुळे राज्याच्या राजकारणात एक मोठी खळबळ उडाली आहे.काँग्रेस बरोबर राष्ट्रवादी म्हणजेच शरद पवार गटाचेही काही नेते भाजपच्या संपर्कात असल्याचं भाजप नेते सध्या वारंवार सांगत आहेत.
तर अहमदनगर जिल्ह्यातील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे आणि त्यांच्या पत्नी अनुराधा नागवडे यांनी सुद्धा काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तर काँग्रेसचे सरचिटणीस विनायक देशमुख यांनी सुद्धा भाजपमध्ये प्रवेश केला त्यामुळे सध्या काँग्रेसला सोडून अनेक जण भाजपमध्ये प्रवेश करण्यात इच्छुक आहेत अशी परिस्थिती असताना लोणावळा येथे काँग्रेसच्या चिंतन बैठकीमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी भाषणात सांगितले की ज्यावेळी राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेस सोडून शिवसेनेत गेले होते त्यावेळी त्यांना पुन्हा घेऊ नका असा सल्ला मी पक्षाला दिला होता मात्र पक्षाने त्यांना पुन्हा प्रवेश देऊन चूक केली आता इथून पुढे काँग्रेस सोडून गेलेल्या नेत्यांना काँग्रेसमध्ये घेऊ नये अशी भूमिका बाळासाहेब थोरात यांनी भाषणात मांडली होती. यावर आता खासदार सुजय विखे पाटील यांनी सूचक प्रतिक्रिया दिली असून बाळासाहेब थोरातच भाजपमध्ये येत असल्याची माहिती मला मिळाली आहे कारण गेल्या काही महिन्यांपासून बाळासाहेब थोरात यांच्या विविध कार्यक्रमांच्या फ्लेक्स बोर्ड वरून सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे फोटो गायब झाले असून फोटो गायब होणे म्हणजे एक तर त्यांच्यामुळे आपण निवडून येऊ शकत नाही अथवा त्यांच्यापासून दूर जाणे असा अर्थ होतो असे सुचक वक्तव्य खासदार सुजय विखे पाटील यांनी केले आहे त्यामुळे खरंच बाळासाहेब थोरात भाजपच्या वाटेवर आहेत का ? असा प्रश्न चर्चेला जात आहे.