अहमदनगर दि ५ ऑक्टोबर
यावर्षी गणपती उत्सवामध्ये महाराष्ट्रामध्ये विविध जिल्ह्यात गणपती आगमन आणि गणपती विसर्जन दरम्यानच्या मिरवणुकांमध्ये मोठमोठ्या आवाजाच्या डीजेची चांगली चर्चा झाली. कान फोडणारा डीजे चा आवाज आणि यामुळे होणारे दुष्परिणाम यावर आता चांगलीच चर्चा झडू लागली आहे. तर या डीजेमुळे काहींचा मृत्यू झाल्याच्याही बातम्या सध्या प्रसारमाध्यमातून वाचायला मिळत आहेत.
तर डीजे बरोबरच लावण्यात येणाऱ्या लेझर लाईट मुळे पुणे आणि नाशिक शहरांमध्ये काही तरुणांच्या डोळ्यांना इजा झाल्याचा ही बातम्या सध्या वाचायला मिळत आहेत त्यामुळे डीजे आणि लेझर याच्यावर बंदी घालावी अशी मागणी आता सर्वसामान्य जनतेतून होऊ लागली आहे.
मात्र आता डीजे मध्येही अनेक प्रकार आले असून शरीराला घातक असलेल्या आवाजामुळे अनेक त्रास होत असल्याची माहिती खुद्द अधिकृत डीजे चालकांनी दिली आहे.योग्य परवानाधारक असलेल्या लेझर,
डीजेची रेंज १५० फूट असते. लोकल डीजे साऊंडची रेंज १ किलोमीटर पर्यंत जाते. अनधिकृत लोकं त्यांचा डीजेचा ब्रॅण्ड आहे, असे सांगतात मात्र तो ब्रँड नसतो. डीजे च्या नावाखाली प्लाझ्मा आणि हे मोठे टॉप वाजवले जातात या प्लाझ्मा मुळे आवाज चांगलाच दूरपर्यंत आणि कानठळ्या बसे पर्यंत वाजतो आणि यामुळेच शरीराला हा प्लाझ्माचा आवाज घातक असतो. अशी माहिती जे अधिकृत डीजे साऊंड सिस्टिम भाड्याने देतात त्यांच्याकडून मिळाली आहे.
ही जरी वस्तुस्थिती असली तरी खरी परिस्थिती याहून अधिक भयंकर आहे गणपती उत्सव असो अथवा आज-काल कोणत्याही उत्साहामध्ये डीजे लावण्याची प्रथा सुरू झाली आहे. आणि या उत्सवांमध्ये राजकीय पदाधिकारी असतोच आणि मग राजकीय पदाधिकारी आला म्हणजे डीजे आला आणि डीजे आला म्हणजे ट्रॅक्टर आला आणि ट्रॅक्टर आला म्हणजे ट्रॅक्टर उभा राहून हा राजकीय नेता हातवारे करत नाचत असतो डीजेची आवाजाची मर्यादा अनेक वेळा ओलांडली जाते मात्र पोलीस प्रशासनही शांततेची भूमिका घेते थातूरमातूर केस करून या प्रकरणावर पडदा टाकतात. जर पोलिसांनी परवानगी नाकारली तर आजकाल थेट मुख्यमंत्र्यांचा अथवा मोठ्या मंत्री नेते यांचा फोन पोलीस प्रशासनाला डीजेसाठी आणण्याची प्रथा महाराष्ट्रात नव्याने सुरू झाली आहे. त्यामुळे अखेर हातबल होऊन पोलीस प्रशासन डीजेला परवानगी देऊन टाकते ही वस्तुस्थिती आहे.
जर पोलिसांनी कडक भूमिका घेऊन अशा डीजेला परवानगी दिली नाही अथवा डीजे वाजवल्यानंतर डीजे जप्त करून कठोर कायदेशीर मोठी दंडात्मक कारवाई केली तर कुठे ना कुठे याला आळा बसू शकतो मात्र राजकीय हस्तक्षेपामुळे मोठ मोठ्या कारवाया होत नाहीत.
पोलीस प्रशासनाबरोबर शांत बसलेले नागरिक हे सुद्धा अशा घातक डीजे ला कारणीभूत आहेत कारण जर प्रत्येकाला त्रास होत असेल तर अशा चुकीच्या गोष्टीविरुद्ध आवाज उठवणे अथवा रस्त्यावर येणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे मात्र जो तो दुसऱ्याकडे बोट दाखवून सरळ मार्गाने निघून जातो आणि चार मुंडके मागे पुढे असलेल्या नेत्याच्या आणि पन्नास टाळकी घेऊन मिरवणुकीत डीजे वाजवत हा नेता आपल्यासमोर फुशारकी करत जात असताना सर्वसामान्य लोकांना पाहत बसावे लागते हीच मोठी शोकांतिका आहे.
डीजे मुळे आता त्रास होऊ लागल्याने महाराष्ट्रातून डीजे वर बंदी आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत त्याचप्रमाणे आता अनेक संघटनाही न्यायालयात धाव घेणार असून हा डीजे बंदच होणे गरजेचे आहे म्हणजे पूर्वीप्रमाणे पारंपारिक ढोल ,ताशा, बँड पथक, भोंगे,साऊंड सिस्टीम वाजवून मिरवणूक होऊ लागल्या म्हणजे निश्चितच धर्माचे आणि संस्कृतीचे रक्षण आणि पालन होईल आणि याचा कोणालाही त्रास होणार नाही तसेच रोजगारही वाढेल.