अहमदनगर दि.१५ एप्रिल
गुंडाचा मूळ आणि कुळ विचारू नये ही एक म्हण आहे पण या गुंडांचा उगम कुठून येतोय हे काही कळतंय का? गुंडा म्हणजे हा सर्वसामान्य व्यक्तीच असतो मात्र कमी श्रम आणि जास्त पैसा मिळायला लागला की माणसाची गुंडाची प्रवृत्ती वाढते आणि सर्वसामान्य माणूस गुंड कधी होतो हे कळतच नाही. फुकट भेटलेल्या पैशाची मस्ती,नशेबाजी त्याला गुंड करते.
जर पोलिसांनी ठरवलं तर चोरी गेलेली सुईसुद्धा पोलीस सापडू शकतात ही झाली म्हण मात्र तेही तेवढेच सत्य आहे. पोलिसांनी ठरवलं तर काहीही होऊ शकतं आणि पोलिसांनी हात बांधले तरीही काहीही होऊ शकतं!मात्र सध्या गेल्या काही वर्षांपासून तरुणांना व्यसन लावणारे ऑनलाइन जुगार हेच खऱ्या प्रकारे गुंडागर्दीचे कारण आहे. आयपीएल सीझन सुरू झाला की अनेक तरुण या आयपीएलच्या सट्टेबाजार मध्ये गुंतून जातात काही पैसे कमवतात तर काही तरुण प्रचंड कर्जबाजारीमुळे आत्महत्या करतात आणि खऱ्या अर्थाने खरे गुंड बनवायचे मूळ आणि कुळ हे ऑनलाइन जुगारच आहेत.
काही दिवसांपासून बिंगो नावाचा एक जुगाराचा ऑनलाईन प्रकार आला आहे हा बिंगो जुगार शहरापासून ग्रामीण भागातल्या शेवटच्या खेड्या पर्यंत पोहोचला आहे. कमी श्रमात जास्त पैसा मिळवण्यासाठी अनेक तरुण या ऑनलाइन बिंगो आणि सुट्ट्यच्या मोहाजालात अडकतात आणि तिथून बाहेर पडणे त्यांना मुश्किल होऊन जाते कमी श्रमात मिळालेला पैसा त्यानंतर एयाशी आणि येणारा मुजोरी यामुळेच गुंड निर्माण होतात.
हे बिंगो आणि सट्टेबाजी पोलिसांना माहीत नसेल का? हा एक हास्यास्पद प्रश्न आहे. प्रत्येकाला ही गोष्ट माहित आहे. बिंगोच्या टपऱ्या अहमदनगर शहरात शेकडो आहेत. बर त्या पोलिसांना माहित नाही हे होणारही नाही. अहमदनगर शहरातील प्रत्येक पोलिसाला बिंगो ची टपरी माहित आहे. तसेच प्रत्येक पोलिसाला सट्टेबाजीचे म्होरके कोण आहेत हेही माहित आहेत. मात्र अशा लोकांना पोलीस हात का लावत नाही हा एक मोठा प्रश्न आहे! का त्यांना काही राजकीय दबाव आहे मात्र तसं पाहिलं तर तोही कधी दिसून येत नाही मग या बिंगो आणि सट्टेबाजांना अभय नेमकं कोणाचे आहे. अनेक तरुणांना कर्जबाजारीच्या खाईत लोटणार्या या जुगार अड्ड्यांवर आता पोलीस अधीक्षकांनीच छापे टाकायची गरज आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला हे कर्तव्यदक्ष अधिकारी असून त्यांनी आता याबाबतीत पुढाकार घेणे गरजेचे आहे. आपल्यातला सिंघम जागवून त्यांनी या बिंगो आणि आयपीएल वर चालणाऱ्या सट्टेबाजीचे पाळे मुळे खोदून काढून मुख्य बुकिंगना आणि बिंगो चालणाऱ्या म्होरक्यांना जेलमध्ये टाकणे गरजेचे आहे. त्यामुळे ही गुंडागर्दी थोडीफार का होईना संपुष्टात येईल.
बिंगो आणि आयपीएल आयडी देणाऱ्या मोहरक्यांचे मोबाईल ताब्यात घेऊन गेल्या दोन महिन्यांपासून किंवा काही वर्षांपासूनचे मोबाईल डिटेल्स तपासले तर यांना अभय कोण देतो यांना अवैध धंदे चालवण्याला कोण प्रोत्साहन देतं हे समोर येईल मग ते कटू का असेना पण सत्य असेल त्यामुळे अशा लोकांवर कारवाई होणे गरजेचे आहे.
काही ठिकाणी अशा बिंगो चालवणाऱ्या आणि सट्टेबाजी करणाऱ्या दलालांना चांगलाच मानसन्मान भेटतो. बिंगो आणि सट्टेबाजीवाल्यांना रेड कार्पेट टाकले जाते यामध्ये सर्वच सहभागी नसतात मात्र बोटावर मोजणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे सर्वांकडेच संशयाने पाहिले जाते असे बोटावर मोजणारे लोक शोधून आणि त्यांचे सट्टेबाजी आणि बिंगो चालकांची असलेले सख्खे शोधून काढले तर शांतता कधीही भंग होणार नाही.